• Wed. Mar 11th, 2026
    Jalna Crime : कारमध्ये बॉडी, डोक्यात गोळी, सागरने जीव दिल्याचं भासवलं, अखेर जालन्यातील व्यावसायिकाच्या मृत्यूचं गूढ उकललं

    Jalna Young Businessman Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यादरम्यान, जालनामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    जालना सागर धानुरे मर्डर केस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : काल रविवारी रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना शहरात व संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडून देणारी घटना उघडकीस आली होती. ती घटना म्हणजे एका 30 वर्षीय तरुणाचा त्याच्याच कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आंबट चौफुली येथे कलावती हॉस्पिटलसमोर मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

    कारमध्ये व्यावसायिकाचा मृतदेह

    मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील कलावती हॉस्पिटलसमोर काल एका कारमध्ये सागर धानुरे नावाच्या व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता. या व्यावसायिकाच्या मृतदेहाजवळ पिस्तुल देखील आढळून आलं होतं. ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात व जालना जिल्ह्यात पसरली. यामध्ये चर्चेला एकच उधाण आलं. ते म्हणजे, ही हत्या की आत्महत्या? त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. पोलिसांनी गुप्त खबऱ्यांमार्फत माहिती काढायला सुरुवात केली. ज्यावेळी सागर धानुरे याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केला. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. त्याच्या अंगावर, छातीवर आणि गळ्यावर धारदार चाकूने वार करत डोक्यात गावठी कट्ट्याची गोळी लागल्याचं डॉक्टरांना दिसून आलं.

    Maharashtra TimesSolapur News: बँकेत नोकरी करायची होती, पण नशिबात ‘नगराध्यक्षपद’ होतं; 22 वर्षीय सिद्धीची इनसाईड स्टोरी, आता म्हणते, आमदार होणार….

    आत्महत्या की हत्या?

    डॉक्टरांच्या माहितीनुसार पोलीस टीमसुद्धा अॅक्टिव्ह झाली व पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. पोलिसांसमोर आता ही आत्महत्या की हत्या? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, जालना पोलिसांच्या तपासादरम्यान ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले, रात्रीच्या नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ही घटना कलावती हॉस्पिटलसमोर सागर धानुरे याच्या कारमध्येच घडली आहे. हे सुद्धा या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोघांना अटक केली आहे. कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले अशी दोन्हीही आरोपींची नाव आहेत.

    पैशांच्या देवाण-घेवाणीतून वाद

    पैशांच्या देवाण घेवाणीच्या वादातून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिलीय. कल्याण भोजने याचे सागर धानुरेशी पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद होते. मयत सागर धानुरे हा कल्याण भोजने याला पैशांसाठी त्रास देत होता. त्यामुळे कल्याण भोजने याने कमलेश झाडीवाले याला धानुरे याला मारण्यासाठी 25 लाखांची सुपारी दिली. शनिवारी 20 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता कमलेश झाडीवाले याने सागर धानुरे याला भेटण्यासाठी कलावती हॉस्पिटलसमोर भेटण्यासाठी बोलावलं आणि सागर धानुरे याच्या गाडीत बसून त्याच्या गळ्यावर गोळीबार केला. तसेच छातीवर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली.

    Maharashtra TimesManikrao Kokate : मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा आमदार माणिकराव कोकाटेंना दिलासा, आमदारकी वाचली; पण…

    24 तासांत घटनेचा उलगडा

    दरम्यान, पोलिसांनी या दोन्हीही आरोपींना अटक केली असून कदीम जालना पोलीस अधिक तपास करत आहेत. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी सागर धानोरे याची आत्महत्या नसून हत्या असल्याचं सिद्ध केलं, त्यामुळे जालना पोलिसांचं व पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या सर्व टीमचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा