Mumbai News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक मोठा नेता गळाला लावण्याचा भाजप प्रयत्न करत असून तसे झाल्यास मुंबईतील त्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
५० जागांची तयारी…
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील जनाधार पूर्वापार अत्यंत मर्यादित राहिलेला आहे. मुंबईतील जनाधार वाढावा यासाठी पक्षाने कधीही फारसे प्रयत्न केले नाहीत. पक्षफुटीनंतर जेमतेम असलेला जनाधार आणखीनच आकुंचित झाला. सना मलिक या पक्षाच्या एकमेव आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या. त्यामुळे नवाब मलिक यांना भाजप लक्ष्य करत असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारे नाही, असे पक्षनेतृत्वाला वाटते. त्यातच मुंबईतील मुस्लिम मतदार काँग्रेसकडून काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे वळावेत, असाही प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ४० जागा पूर्ण ताकदीनिशी लढविण्याची लढविण्याची तयारी केली असून त्यात आणखी दहा ते १५ जागांची भर पडण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुरक्षित प्रभागांवरच लक्ष
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळलेले काही मोठे नेतेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून त्यांचा पक्षात प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादी एकूण किती जागा लढविणार, हे नक्की ठरणार असल्याचे समजते. एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई महानगरपालिकेत ज्या जागा लढवणार आहे, त्यातील भाजपच्या विरोधात फारच थोड्या जागा असतील. प्रामुख्याने शिवसेना व काँग्रेस या पक्षांचा जनाधार असलेल्या प्रभागांमधूनच राष्ट्रवादी आपले उमेदवार मैदानात उतरवणार असल्याची रणनीती असल्याचे संबंधित नेत्याने सांगितले.
नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्रे आहेत तोवर राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत घेऊ नये, असा आग्रह भाजपने धरला असल्याने पक्षाने मुंबईत स्वबळावर उतरण्याचे संकेत दिले आहेत.
Manikrao Kokate : विधानसभेला ठाकरेंच्या शिलेदाराची उघड मदत, कोकाटेंकडून परतफेड, भाजपचा फायदा टाळण्यासाठी मोठी ‘चाल’
शरद पवार यांच्याशी आघाडी?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत अजित पवार यांनी स्वतंत्र चूल मांडली असली तरी या फाटाफुटीनंतर दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कौटुंबिक सोहळ्यांत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एकत्र येण्याचे संकेत याआधीही दोन्ही बाजूकडील नेत्यांकडून देण्यात आले होते. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मुंबईतील जनाधार मर्यादित आहे. त्यांच्याकडील एक मोठा नेता गळाला लावण्याचा भाजप प्रयत्न करत असून तसे झाल्यास मुंबईतील त्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याशी आघाडी करण्याचा मानस राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्याने व्यक्त केल्याचे समजते.
