Monsoon Update: दक्षिण भारतात मान्सूनचा प्रवास सुरू असला तरी महाराष्ट्रात तो रखडला आहे. महामुंबईत तापमान वाढलेलं असून येत्या आठवड्यातही राज्याला दिलासा मिळणार नाही. रविवार, 14 जून रोजी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर ठिकाणी हवामान कसं असेल?
महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या दैनंदिन अद्ययावत माहितीमध्ये १२ जूनपर्यंत पुढच्या तीन-चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकेल असे सांगण्यात येत होते. मात्र शनिवारी १३ जून रोजी अचानकपणे या अद्ययावत माहितीतून महाराष्ट्राचे नाव काढण्यात आले. १३ जूनच्या माहितीनुसार २ ते ३ दिवसांमध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशाचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगडचा भाग येथे मान्सून पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नसून महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रावरचे चिंतेचे ढग अधिक गडद झाल्याचे चित्र आहे.
1950नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती, Super El Ninoची 63 टक्के शक्यता; डिसेंबरपर्यंत तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज
सॅटेलाइट चित्रांमध्ये पाहिले असता महाराष्ट्रावर पावसाचे ढग कुठेही दिसत नाहीत. महाराष्ट्रात पावसाचा पुढचा प्रवास १९ ते २० तारखेपर्यंत लांबू शकतो असे मत अभ्यासकांकडून नोंदवले जात आहे. महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीयवात स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उष्ण वारे बाहेर फेकले जात आहेत. या उष्ण वाऱ्यांमुळे पावसाळी ढगांची निर्मितीही होत नाही. सध्या वायव्येकडून मोठ्या प्रमाणात वारे असून पश्चिमेकडून येणारे वारे थोड्या प्रमाणात आर्द्रता घेऊन येत आहेत. परिणाम किमान तापमानाचा पारा चढाच आहे. मात्र ही आर्द्रता पावसासाठी पुरेशी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्द्रता मिळत असल्याने सात दिवसांपासून अधिक दिवस मुंबईतील किमान तापमान ३० किंवा त्यापुढे नोंदवले जात आहे.
राज्याच्या अंतर्भागातही किमान तापमान सरासरीपेक्षा चढे आहे. कमाल तापमान आणि सरासरी तापमानातील फरक खूप मोठा आहे. अहिल्यानगर येथे ४, मालेगाव येथे ४.४, सातारा येथे ४.५ तर सांगली येथे ४.१ असा फरक कमाल तापमान आणि सरासरी तापमानात नोंदला गेला आहे.
मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट
प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये १६ जूनपर्यंत उष्ण आणि दमट वातावरण कायम राहू शकते. त्यानंतर कदाचित मेघगर्जनेसह पावसाची नोंद होईल. मात्र हा पाऊस फार मोठ्या प्रमाणात नसेल. उर्वरित राज्यात रविवारी नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम येथे रविवार, सोमवार या दिवशी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. अमरावती, बुलडाणा येथे रविवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसं असेल?
कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास रखडला आहे. पुण्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर नोंदवलं जाऊ शकतं. कोल्हापूर आणि इतर घाट प्रदेशात पूर्वमान्सूनच्या सरी बरसू शकतात.
Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास रखडला, आता राज्यावर दुहेरी संकट, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा
खानदेशातील हवामान पाहा
खानदेशातही मान्सूनचं आगमन रखडलं असून दिवसात तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून उष्मा कायम असेल. येत्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी मुसळधार सरींसाठी नागरिकांना जुलैअखेरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
