Kalyan-Pendhar Metro: कल्याण ते पेंधर मेट्रो मार्गिका १२ वर डोंबिवली एमआयडीसी स्थानकाजवळ शंभरावा गर्डर बसवण्यात आला. यातून १३ मेट्रो मार्गिकांशी जोडणी होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
कल्याणला डोंबिवली व तळोजा औद्योगिक वसाहतीमार्गे नवी मुंबई मेट्रोशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने या मार्गिकेचे नियोजन केले होते. सुरुवातीला ही मार्गिका तळोजापर्यंतच होती. मात्र, तळोजापासून चार किमी पुढे नवी मुंबई मेट्रोचे पेंधर स्थानक आहे. त्यानुसार नवी मुंबई मेट्रोशी संलग्नता मिळण्याच्या दृष्टीने जुने आरेखन बदलून नव्याने निविदा काढली गेली होती. त्यानुसार आता ही एकूण २३.५७ किमी व १९ स्थानकांची कल्याण (कृषी उत्पन्न बाजार समिती) ते पेंधर अशी मार्गिका आहे.
मोठी अपडेट! जेएनपीला जोडणार 14 किमीचा मार्ग, बडोदा-मुंबई एक्सप्रेसवे कुठून-कुठे? जाणून घ्या
कल्याण जंक्शन ला जोडणार
ही मार्गिका कल्याण-शिळफाटा-तळोजा या मार्गाला समांतर धावणारी आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण आंतर-बदल होत आहेत. त्याद्वारे ही मार्गिका कल्याण येथे बांधकामाधीन ठाणे-कल्याण उन्नत मेट्रो मार्गिका ५, हेदूटने येथे विक्रोळी-बदलापूर प्रस्तावित मेट्रो मार्गिका १४, अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ तसेच कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकाशी ही मार्गिका जोडली जाणार आहे. हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.
ही मार्गिका एकीकडे नवी मुंबई मेट्रोशी जोडली जात असताना दुसरीकडे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मेट्रो स्थानकाजवळ ठाणे-कल्याण या मेट्रो मार्गिका ५ शी जोडली जाणार आहे. मेट्रो ५ ही मार्गिका ठाणे-घाटकोपर-वडाळा या मेट्रो ४ शी संलग्न आहे. तर वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा मेट्रो ११ भूमिगत मार्गिकेचेही काम सुरू झाले आहे. त्यानुसार उत्तर ते दक्षिण, अशा १३ मेट्रो मार्गिकांशी मेट्रो १२ संलग्न असेल.
कोणते स्थानके असतील?
मेट्रो १२ मध्ये कल्याण, बाजार समिती, गणेशनगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागांव, सोनारपाडा, मानपाडा, हेदूटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाले, वाकलान, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे व अमनदूत या स्थानकांचा समावेश आहे.
Supriya Sule | इंडिगो विमानसेवा विस्कळीत, भारत सरकारने ॲक्शन घ्यावी; सुप्रिया सुळे भडकल्या
‘कळवा’ स्थानकाचा चुकीचा उल्लेख
मेट्रो १२ ही कल्याण-शिळफाटा- तळोजा-पेंधर आहे. तर मेट्रो ५ ही कल्याण ते ठाणेदरम्यान उल्हास नदीच्या उत्तरेकडून आहे. यामध्ये कळवा स्थानकाचा कुठेही संबंध नाही. एमएमआरडीएने मात्र त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात ‘कळवा येथे मेट्रो लाइन ५’ व ‘कळवा जंक्शन’ येथे मध्य रेल्वेशी ही मार्गिका जोडली जाईल, असे जाहीर केल्याने संभ्रम निर्माण झाला.
