Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मार्गावर मेट्रोसाठीही जागा ठेवण्याचे आदेश दिले असल्याने भविष्यात मेट्रो ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सरकार प्राधान्य देत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते शिक्रापूर, पुणे ते खेड आणि पुणे ते यवत असे तीन उन्नत मार्ग करायचा निर्णय घेतला होता. त्यातील काही रस्ते महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ करणार आहे. हा मार्ग भैरोबानाला येथून सुरू करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने लावून धरली होती. स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारकडे तशी मागणीही केली होती. राज्य सरकारकडून हडपसर ते यवत असा सहापदरी उन्नत मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. सोलापूर रस्त्यावर हा उन्नत मार्ग बांधण्यात येत असून, हडपसरपासून हा मार्ग सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. हा पूल फातिमानगर, भैरोबानाला येथून सुरू केला. तर त्याचा फायदा या परिसरात राहणाऱ्या दोन लाख नागरिकांना होईल.
या रस्त्यावर शहरात भैरोबा नाला ते हडपसर हा ‘बॉटल नेक’ होतो. त्यामुळे भैरोबा नाल्यापासून हा रस्ता सुरू केला नाही, तर हडपसरपर्यंत जाण्यासाठी तासाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सरकारने हा उन्नत मार्ग भैरोबानाल्यापासून सुरू करावा, अशी स्थानिकांची आग्रही मागणी होती.
दरम्यान, नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधांच्या बैठकीत फडणवीस म्हणाले, ‘नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास सरकारचे प्राधान्य आहे. पुणे-नगर रस्त्यावरही उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. तेथेही मेट्रोचा मार्ग भविष्यात तयार करावा लागणार आहे. ‘महामेट्रोकडून’च पालिकाहद्दीतील उन्नत मार्ग बांधण्यात यावा, याबाबतची तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे ते यवत हा मार्ग तयार करताना ‘मेट्रो’ मार्गाचा त्यात अंतर्भाव करण्यात यावा.’
