• Thu. Jun 18th, 2026
    Mumbai News: महापालिकेने हात झटकले; खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पॅकेजिंगच्या निर्णयाबाबत सरकारकडे बोट

    मुंबई : प्रतिबंधित ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या विक्री व वापरावर मुंबई महापालिकेकडून कारवाई केली जात असली, तरी प्लास्टिकचा वापर अद्यापही मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. विशेषतः खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांमुळे नाले तुंबून पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. मात्र, याबाबत महापालिकेने खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांवर उत्पादनाच्या ठिकाणीच निर्बंध घालणे अधिक योग्य ठरेल, असा अभिप्राय देत जबाबदारीचा चेंडू राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांच्या कोर्टात टोलवल्याची चर्चा आहे.

    मुंबईत फेरीवाले, व्यापारी, दुकानदार तसेच ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत आहे. सणासुदीच्या काळात हे प्रमाण आणखी वाढते. प्लास्टिकमुळे नाल्यांमधील पाण्याचा निचरा बाधित होऊन अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडतात. त्यामुळे प्लास्टिकविरोधी कारवाया नियमितपणे केल्या जात असल्या, तरी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

    Maharashtra Water Crisis: पाण्याचा जपून वापर करा! मुख्यमंत्र्यांचा सल्ला, राज्यातील पाणीसाठा 25 टक्क्यांवर
    प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर, साठवणूक किंवा वितरण करणाऱ्यांवर पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार, दुसऱ्यासाठी दहा हजार आणि तिसऱ्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच तीन महिन्यांच्या कारावासाचीही तरतूद आहे. तरीही प्लास्टिकचा वापर आणि विक्री धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येते.

    या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदी घालण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. तसेच उत्पादक कंपन्या आणि वितरकांना विघटनशील व पर्यावरणपूरक वेष्टनांचा वापर सक्तीचा करण्यासाठी नियमावली तयार करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, महापालिकेने दिलेल्या अभिप्रायात अन्नधान्य, किराणा माल व अन्य वस्तूंच्या सीलबंद प्लास्टिक पॅकेजिंगला विशिष्ट अटींवर मुभा असल्याचे नमूद केले आहे.

    महापालिकेच्या अभिप्रायानुसार, पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीचे आणि किमान दोन ग्रॅम वजनाचे असणे आवश्यक आहे. तसेच प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल व एकदाच वापरल्या जाणाऱ्या काही प्लास्टिक वस्तूंच्या साठवणूक व विक्रीवर बंदी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    महापालिकेने आपल्या अभिप्रायात खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांवर उत्पादनाच्या टप्प्यावरच निर्बंध घालणे अधिक सोयीचे ठरेल, असे नमूद केले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवाने देताना आवश्यक अटी व खबरदारी लागू केल्यास त्याचा अधिक परिणामकारक उपयोग होऊ शकतो, असेही म्हटले आहे. त्यामुळे अविघटनशील प्लास्टिक वेष्टनांवरील बंदीच्या मागणीवर महापालिकेने थेट निर्णय न घेता जबाबदारी अन्य यंत्रणांकडे ढकलल्याची चर्चा सुरू आहे.

    Maharashtra TimesMumbai Water Crisis: मुंबईत बांधकामांचे पाणी बंद! BMCकडून आजपासून पाणीवापरावर कडक निर्बंध लागू
    १.२० लाख किलो प्लास्टिक जप्त
    जून २०१८ ते मार्च २०२६ या कालावधीत महापालिकेने प्लास्टिकविरोधी मोहिमे अंतर्गत २९ लाख १२ हजार १५६ तपासण्या केल्या. या कारवाईत १ लाख १९ हजार ४३७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच १८ हजार ४०८ प्रकरणांमध्ये ९ कोटी २१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

    वेफर्स, चिवडा आणि अन्य कुरकुरीत खाद्यपदार्थाच्या प्लास्टिक पुड्या वापरल्यानंतर रस्ते, पदपथ आणि नाल्यांमध्ये फेकल्या जातात. या अविघटनशील वेष्टनांमुळे कचरा वाढतो आणि नाले तुंबण्यास हातभार लागतो. त्यामुळे अशा प्लास्टिक वेष्टनांवर बंदी घालण्याची आवश्यकता आहे. -प्रीती सातम, भाजप नगरसेविका

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed