पनवेल येथून मोठी बातमी समोर येत आहे. इथे आज दुपारी सीएसटीएन–जेएनपीटी रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना घडली होती. पण सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. पण यामुळे काही काळ मालवाहतूक विस्कळीत झाली होती.
रेल्वे नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, दुपारी 11.28 वाजता सीएसटीएन–जेएनपीटी 45 BLC मालगाडी पनवेल स्थानकाजवळील पाचव्या फलाटातून पुढे जात होती. त्यावेळी 12.25 वाजता एका कंटेनर ट्रॉलीचा तोल जाऊन ती रुळावरून घसरली. अपघात कळंबोलीकडे जाणाऱ्या पॉईंटवर तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 5 च्या क्रॉस-ओव्हर पॉईंटवर झाल्याने अप-डाऊन मुख्य लाईनची वाहतूक विस्कळीत झाली. तातडीने तांत्रिक पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आणि अपघातग्रस्त कंटेनर हटविण्याचे काम युद्धपातळीवर पार पडले.
घटनास्थळ नवीन पनवेल पुलाखाली असल्याने काही काळ स्थानिक परिसरात गोंधळाचे वातावरण होते. वळणावर येताच काही डबे डगमगले आणि रुळाबाहेर गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही डब्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
‘एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार’, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि पनवेल पोलिसांनी परिसर सील करून वाहतूक नियंत्रणात ठेवली. मालवाहतुकीवर या अपघाताचा तात्पुरता परिणाम झाला असला, तरी मार्गावरील प्रवासी वाहतूक स्वतंत्र असल्याने प्रवाशांना कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
HSRP नोंदणी केली का? करुन घ्या, नाहीतर ‘या’ तारखेनंतर दंड ठोठावणार
दरम्यान, अपघाताचे अचूक कारण शोधण्यासाठी रेल्वे विभागाने उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे. तांत्रिक बिघाड, ट्रॅक स्थिती किंवा यांत्रिक त्रुटी यांपैकी कोणत्या कारणामुळे ही घटना घडली, याबाबतचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी जळगावच्या अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डब्बा रुळावरुन घसरल्याची घटना घडली होती. ही घटना अत्यंत मोठी आणि गंभीर होती. या अपघातात सुरतच्या दिशेला जाणारी आणि जळगावच्या दिशेलाही जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. अनेक तास तिथे पूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. विशेष म्हणजे प्रवाशांना थेट या अपघाताचा फटका बसला होता. आजच्या पनवेल येथील अपघातात सुदैवाने सर्वसामान्य प्रवाशांना कोणताही फटका बसला नाही.
