नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगर परिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचं बघायला मिळत आहे. कारण या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही महायुतीमधील पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे केले आहेत.
जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका तळोद्याची आहे. या पालिकेत 10 प्रभाग असून नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार, नगरसेवक पदाच्या 21 जागांसाठी 65 उमेदवार रिंगणात आहेत. शहरात 26 हजार 830 मतदार आहेत. भाजपतर्फे जितेंद्र सूर्यवंशी यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या पंचवार्षिकला जितेंद्र सूर्यवंशी पालिकेत स्विकृत नगरसेवक होते. त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. मात्र ते माजी नगराध्यक्ष भरत माळी यांचे कुटुंबीय असल्याने घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. आमदार राजेश पाडवी यांच्यासह भाजपची संपूर्ण ताकद सूर्यवंशी यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे.
Nandurbar Elections : AIMIM आणि NCP पक्षांमुळे राजकीय गणितं बदलणार? शहादाच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट
शिवसेनेतर्फे हितेंद्र क्षत्रिय यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या पंचवार्षीक निवडणूकीत हितेंद्र क्षत्रिय निवडून आले होते. ते पालिकेत माजी बांधकाम सभापत ही होते. त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभाही घेतली. त्यांच्यासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी यांनी पूर्ण ताकद लावली आहे.
राज्यात सत्तेत, पण नंदुरबारमध्ये महायुतीत कमालीचा राजकीय संघर्ष, नगर परिषद निवडणुकीत 2 आमदारांची प्रतिष्ठा पणाला
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी योगेश चौधरी यांनी भाजपतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत राष्ट्रवादीचे पॅनल रिंगणात उतरवले आहे. योगेश चौधरी यांनी त्यांच्या पत्नी भाग्यश्री चौधरी यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्या उपनगराध्यक्ष होत्या. त्यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सना मलिक, राष्ट्रवादीचे तरुण नेते सूरज चव्हाण यांनी सभा घेतल्या. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी पूर्ण ताकद लावली आहे. या निवडणुकीत महायुतीतील तीनही घटक पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
