Mumbai Local: नवीन वर्षात पश्चिम रेल्वे प्रवाशांना 15 डब्यांच्या लोकलची भेट मिळणार आहे. विरार-डहाणू मार्गावर ही सेवा सुरू होणार असून, सुरुवातीला 6 लोकल गाड्यांमध्ये बदल केला जाईल.
विरार-डहाणू दरम्यान विशेष सेवा
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर विरार–डहाणू ही लोकल सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेटिंग विभागाकडून रेल्वे बोर्डाला पत्र पाठवण्यात आले असून, हे मंजूर होताच विरार ते डहाणूदरम्यान 15-डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू होतील. सुरुवातीला सहा लोकल गाड्यांचे रूपांतर 15 डब्यांच्या लोकलमध्ये करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या सहा गाड्यांद्वारे एकूण 40 फेऱ्या चालवल्या जातील. हे नवीन वेळापत्रक मार्च–एप्रिल महिन्यात लागू होण्याची दाट शक्यता आहे.
फुकट्या प्रवाशांचे फंडे अजब! चक्क एआय वापरून बनवला एसी लोकलचा पास; मुंबईत इंजिनिअरला पत्नीसह अटक
विरार स्थानकावर यंदा ऑक्टोबरपर्यंत दररोज 50 हजारांहून अधिक प्रवासी नोंदवले गेले होते. त्याचबरोबर डहाणूपर्यंतच्या मार्गावरील वैतरणा, सफाळे, केल्वे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वणगाव आणि डहाणू रोड या स्थानकांवरही 10 हजार ते 30 हजार प्रवाशांची नोंद होते. पीक अवरमध्ये ही गर्दी सर्वाधिक असते. तसेच मध्य रेल्वेच्या तुलनेत या मार्गावर कमी गाड्या धावत असल्यामुळे प्रवाशांवर अधिक ताण येतो. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकलमुळे एका फेरीत 20 ते 25 टक्के गर्दी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चर्चगेट-विरार मार्गावर गिफ्ट
यासोबतच नवीन वर्षात पश्चिम रेल्वेला आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. चर्चगेट–विरार दरम्यान आणखी एक एसी लोकल प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे एसी लोकलच्या 10 ते 12 फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. जानेवारीपासून हे नवीन वेळापत्रक सुरू होण्याची चिन्हे आहेत.
Manoj Jarange | आरक्षणाला विरोध केला त्याचं खच्चीकरण झालं पाहिजे! मतदानापूर्वी मनोज जरांगेंचं आवाहन
वीकेंडच्या वेळी पालघर आणि डहाणूला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे जर 15 डब्यांच्या एसी लोकलच्या फेऱ्याही सुरू केल्या गेल्या तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. सुरुवातीला केवळ सहा गाड्यांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव असून, पुढील काळात गाड्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याची योजना आहे.
