• Fri. Mar 6th, 2026
    Nashik Politics: रात्र थोडी, सोंगे फार! उमेदवारांकडून नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग

    Nashik Politics: नगरपालिका निवडणूक जशी जवळ येतेय तसा प्रचाराला वेग येत असून कमी दिवस राहिल्याने प्रचाराला वेग आला आहे.

    prachar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    नाशिक: नगरपरिषद, नगरपालिकांची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना जिल्हाभरात प्रचाराला जोर चढला आहे. ताई, माई, आक्काचे स्वर पुन्हा गल्लोगल्ली घुमू लागले असून, उमेदवारांसह त्यांचे समर्थक गल्ल्या पिंजून काढत आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी साकडे घालत आहेत.

    रेल्वे, बाजार, अंत्ययात्रेतही प्रचार
    मनमाड :
    कोणी रेल्वेत, कोणी बाजारात तर कोणी अगदी अंत्ययात्रेतही ‘भाऊ, लक्ष राहू द्या’ असे साकडे घालत आहेत. विशेष म्हणजे, महिलावर्गही प्रचारात मागे नसून, लग्न समारंभात सहभागी होऊन लग्नातील उपस्थित महिलांना मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांच्या घरातील महिला, स्वतः उमेदवार करत आहेत. चिन्हवाटप झाल्याने राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार झपाटून प्रचाराला लागले आहेत. काहीजण रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांच्या गाड्यांमध्ये जाऊन नवमतदार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. काही बाजारात जाऊन विक्रेते, खरेदीदार यांना गळ घालत आहेत.

    चौकसभांमुळे प्रचारात रंगत
    येवला :
    येवला नगरपालिका निवडणुकीत चौकसभांमुळे प्रचारात रंगत आली आहे. बुधवारपासून शहरात सायंकाळच्या सुमारास चौकसभा होत आहेत. या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत आहे. माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध प्रभागात महायुतीच्या उमेदवारांच्या चौकसभा होत असून, शनिवारपर्यंत शहरात अशाच प्रकारे चौकसभा होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. महायुतीच्या वक्त्यांकडून या विकासकामांवर भर दिला जात आहे.

    पथनाट्याद्वारे मतदानजागृती
    मनमाड : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मनमाड नगरपरिषद व गुड शेफर्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मनमाड शहरात पथनाट्य सादर करून नागरिकांना मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. गुड शेफर्ड शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकात्मता चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केलेल्या मतदान जनजागृती पथनाट्य उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. शाळेचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू, ऋषिराज तगारे, पराग पाखले, मनोज देशपांडे, अरुण गोसावी, अनिल गंडाळ यांनी संयोजन केले.

    त्र्यंबकमध्येही मागितला जातोय प्रचाराचा जोगवा
    त्र्यंबकेश्वर :
    त्र्यंबक नगरी जाहीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांच्या जाहीर प्रचाराने दुमदुमली आहे. ऑटो रिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून त्यावर उमेदवारांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला जात आहे. त्यासाठी गाणी तयार करून ती मोठ्या आवाजात वाजवली जात आहेत. प्रभागरचना करताना त्यात दोन ते तीन प्रभाग प्रत्येक गल्लीत येतात. एका प्रभागात किमान चार उमेदवार असे एका गल्लीतून १० ते १२ ऑटो रिक्षा ध्वनिक्षेपक वाजवत फिरतात. त्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या प्रचार वाहनांची भर पडते. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहापर्यंत हा प्रकार सुरू आहे. अनेकदा दोन-चार रिक्षा एकाच वेळी समोरासमोर येतात. रस्त्याच्या कडेला घर असलेले, व्यावसायिक दुकानदार सर्वांनाच डोकेदुखी निर्माण करणारी स्थिती अनुभवास येत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा