Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अपहरण करून अमानुषपणे हत्या झालेल्या देशमुख यांच्या कुटुंबीयांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे. त्यांची कन्या वैभवी देशमुख वडिलांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार
वैभवी देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या, वडिलांनी आमच्यासाठी कमी, मात्र भावासाठी आणि समाजासाठी स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे. संतोष देशमुख हे केवळ कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण गावांसाठी आणि समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्यकाळात मस्साजोग ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळाले होते.
‘वाल्मीक कराडला फाशी होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा निर्धार
न्याय न मिळाल्याची खंत
हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी, आपल्या वडिलांना न्याय मिळाला नाही, अशी खंत वैभवी यांनी यावेळी बोलून दाखवली. या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. या हत्येने केवळ एका कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण तालुक्याला आणि राज्याला हादरवून सोडले होते. संतोष देशमुख यांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, संपूर्ण देशमुख कुटुंब आणि त्यांचे हितचिंतक आज त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन करत आहेत आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळो,अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
