महेश गायकवाड, ठाणे : हॅन्डल लॉक न करता पार्क केलेल्या दुचाकी हेरुन त्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा कासारवडवली पोलिसांनी पर्दाफाश करीत मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी काही विशिष्ट प्रकारच्याच दुचाकी चोरी करत होते. त्यांच्याकडून आठ दुचाकीसह सहा मोबाइल, एक टॅब, १४ सिमकार्ड, इलेक्ट्रिक फ्यूज जप्त करण्यात आले आहेत. दुचाकी चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे.
मागील दोन महिन्यात हिरानंदानी इस्टेट परिसरातून विशेषत: रॉयल इनफिल्ड हंटर बुलेट आणि सुझुकी बर्गमॅन या दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार घडले होते. या दुचाकीच्या चोरीमध्ये टोळी सक्रीय असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यादृष्टीने कासारवडवली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या पथकाने घोडबंदर रोड, मिरारोड, दहिसर, कांदिवली, अंधेरी, सांताक्रुझ परिसरातील १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पाहणी केली. या पाहणीतून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळताच सोहेल अब्दुल शेख (२१) याला अटक केली. तो सांताक्रुझला राहतो. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या असून तो या प्रकरणात रिसीव्हर असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. शेखच्या चौकशीत दुचाकी चोरीच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मिलींद सावंत (३०) असल्याची बाब स्पष्ट झाली.
मुंबईतील कांदिवलीमध्ये राहणारा सावंत याचा मुंबई, मिरारोड, कोकण पट्ट्यात आणि बेंगळुरु येथे शोध घेतला. अखेर पोलिसांनी दहिसर येथे सापळा लावून त्याला अटक केली. सावंत याने त्याचा नालासोपारा येथील सहकारी भूषण पुरी उर्फ राम गोस्वामी (४६) याच्याबरोबर नऊ दुचाकींची चोरी केल्याची बाब चौकशीत उघड झाली. त्यामुळे पोलिसांनी नालासोपारामधून भूषण याला अटक केली.
अशी होती गुन्ह्याची पद्धत
आरोपी मिलींद सावंत आणि भूषण पुरी हे दोघे हॅन्डल लॉक नसलेल्या रॉयल इनफिल्ड हंटर बुलेट आणि सुझुकी बर्गमॅन दुचाकी हेरत असत. नंतर त्या दुचाकी काही अंतरावर ढकलत नेऊन कटरने दुचाकीची मुख्य स्वीचची वायर कट करुन त्यांच्याकडे असलेला इलेक्ट्रिक फ्यूज दुचाकीला लावत दुचाकी सुरु करीत ही दुचाकी चोरी करत होते. चोरीच्या दुचाकी मिरारोड परिसरात तीन ते चार दिवस उभ्या करुन ठेवत होते. या दुचाकींचा कोणी शोध घेत नसल्याची खात्री पटल्यानंतर एका ॲपवर चोरलेल्या दुचाकीच्या मिळती-जुळती वर्णनाच्या दुचाकीचा नंबर घेऊन एम परिवहन ॲप्लिकेशनवरुन त्या नंबरचा तपशील प्राप्त करत होते. त्याप्रमाणे आरसी बूक आणि अन्य माहिती डाऊनलोड करुन त्यातील माहितीप्रमाणे बनावट नंबर प्लेट बनवत होते. नंतर चोरीच्या दुचाकीचे फोटो ऑनलाइन पार्टलवर विक्रीसाठी अपलोड केले जात असल्याची बाब समोर आली आहे. आरोपी सोहेल शेख हा मध्यस्थ होता. तर, आरोपी चोरीच्या दुचाकी एक लाखांच्या आसपास विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गॅरेजमध्ये काम ते दुचाकी चोरी
मिलींद हा पूर्वी गॅरेजमध्ये काम करत असल्याने त्याला वाहनाविषयी माहिती आहे. त्याच्यावर यापूर्वी ७० पेक्षा जास्त दुचाकी चोरीचे आणि इतर गुन्ह्यांची नोंद आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने शिक्षा देखील ठोठावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हॅन्डल लॉक व्यवस्थित करा
प्रत्येक दुचाकीस्वाराने दुचाकीचा हॅन्डल लॉक व्यवस्थित लावावा. विशेषकरुन हॅन्डल लॉक झाला की नाही हेही तपासावे, अशी सूचना पोलिस उपायुक्तांनी केली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा