• Fri. Jun 19th, 2026

    इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 16, 2026
    इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १६ : सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर)उपक्रमांतर्गत मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय (सायन रुग्णालय) येथे अत्याधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे रुग्णांना जलद आणि अचूक निदान सेवा मिळणार असून उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. इंडियन ऑइलसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी सीएसआर माध्यमातून आरोग्य सेवेसाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. सायन रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या या अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझरमुळे निदान प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक होईल. त्यामुळे डॉक्टरांना उपचारासंदर्भात तातडीने निर्णय घेणे शक्य होईल आणि रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळेल. लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे मुंबईसह राज्यातील विविध भागांतील हजारो रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणारे महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर रक्त तपासण्या करण्यात येत असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढत असतो.

    नव्याने उपलब्ध झालेल्या या उच्च क्षमतेच्या पूर्ण स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझरमुळे तपासणी अहवाल देण्याचा कालावधी लक्षणीयरित्या कमी होणार आहे.ही अत्याधुनिक यंत्रणा मोठ्या प्रमाणात नमुन्यांची जलद प्रक्रिया करण्यास सक्षम असून त्यातून अधिक अचूक व विश्वासार्ह अहवाल उपलब्ध होणार आहेत. यामुळे रुग्णांच्या निदान प्रक्रियेला गती मिळून उपचार तातडीने सुरू करणे शक्य होईल. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

    राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध कॉर्पोरेट संस्थांमधील सहकार्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सायन रुग्णालयात उपलब्ध झालेल्या या आधुनिक वैद्यकीय उपकरणामुळे प्रयोगशाळेची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच रुग्णांचा प्रतीक्षाकाल कमी होऊन आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत होणार आहे.

    ०००००

    दत्तात्रय कोकरे/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed