• Wed. Jun 10th, 2026
    ऐतिहासिक भिवगड किल्ल्याच्या काही भाग कोसळला, दुर्गप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी

    शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऐतिहासिक भिवगड किल्ल्याच्या काही भाग कोसळल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी काही आदिवासी बांधवाची घरे आहेत. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाल्याची घटना समोर आलेली नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : कर्जत तालुक्यातील गौरकामत परिसरातील ऐतिहासिक भिवगड किल्ल्याच्या डोंगराचा एक मोठा भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिमेकडील मुख्य कड्यावरून सुमारे पंधरा ते वीस फुटांचा भाग खाली कोसळला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, डोंगररचनेची घसरण सुरू असल्याने या घटनेला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

    भिवगड किल्ला हा शिवकालीन वारशाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर झाल्याच्या अनेक ऐतिहासिक नोंदी आढळतात. किल्ल्यावरील तटबंदीचे अवशेष, गुहा आणि प्राचीन बांधकाम आजही इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. किल्ल्याभोवतालचा भाग निर्जन असला तरी उत्तर बाजूस असलेल्या आदिवासी वाडीला धोका निर्माण होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

    भिवगड अखंड संवर्धन समिती अनेक वर्षांपासून या किल्ल्याचे जतन, स्वच्छता आणि संवर्धनाचे उपक्रम सातत्याने राबवत आहे. समितीच्या सदस्यांनी सांगितले की, आता झालेल्या या नुकसानीमुळे डोंगराची मजबुती कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी प्रशासनाकडे तातडीने भूस्खलन तपासणी आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

    भिवगड किल्ला हा केवळ कर्जत तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या इतिहास आणि अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासन, संवर्धन समिती आणि इतिहासप्रेमी यांचे संयुक्त प्रयत्न होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा