गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबातील वाद प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण दोघांमधला वाद आता मिटला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबातील वाद पूर्णपणे मिटला आहे. गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबियांचा एकत्र व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अपर्णा मरगळे ही गौतमी पाटीलने येऊन आपल्या वडिलांची विचारपूस केल्याचं स्मितहास्य करत सांगताना दिसत आहे. तर गौतमी पाटील ही एकदम शांतपणे, चेहऱ्यावर कोणताही हावभाव न दाखवता बसलेली दिसत आहे. यामुळे कहाणीत ट्विस्ट आल्याची चर्चा आहे
काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या नावावर असणाऱ्या चारचाकी गाडीने एका रिक्षाला जोराची धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. जखमी रिक्षाचालकाला तसंच सोडून गौतमी पाटील हिचा गाडीचालक हा पळून गेला होता. स्थानिक नागरिकांनी रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल केलं होतं. रिक्षा चालकावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरु होते. ते गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. संबंधित प्रकरणातील चारचाकी ही गौतमी पाटील हिच्या नावाने नोंद असल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रकरण तापलं होतं. गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित कुटुंबियांकडून केली जात होती. पण अपघातावेळी गौतमी गाडीत नव्हती. त्यामुळे गौतमीवर गुन्हा दाखल करता येणार नाही, असं पोलिसांचं म्हणणं होतं.
गौतमीला अटक करावी या मागणीसाठी पुण्यात पोलीस ठाण्याबाहेर आंदोलने देखील झाली होती. या प्रकरणी वातावरण तापल्यानंतर गौतमीने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती. यावेळी पीडित कुटुंबियांनी आपल्याकडे लाखोंची मागणी केली, असा दावा गौतमीने केला होता. त्यानंतर अपर्णा मरगळे हिने कुणाकडे लाखो रुपयांची मागणी केली ते सांगण्याचं आव्हान दिलं होतं. या प्रकरणी वाद शिगेला पोहोचताना दिसत होता. पण अचानक हा वाद मिटवण्यात आला आहे.
गौतमी पाटीलच्या वाहनाच्या धडकेत जखमी झालेले मरगळे यांची कन्या अपर्णा मरगळे हिने गौतमी पाटीलचे आभार मानले आहेत. “वडिलांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर गौतमी पाटीलने स्वतः आमच्या घरी येऊन वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली आणि आमची विचारपूस केली. आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्या कुटुंबाची भेट घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत”, असं अपर्णा मरगळे हिने म्हटलं आहे. मात्र, ही केस कायदेशीर पेचात अडकलेली असताना पुढे नक्की काय होणार? हे प्रकरण कायदेशीररित्या थांबणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

