Pune Election News: राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आगामी निवडणुका स्वबळावर की महायुती म्हणून लढवायच्या, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे बिगुल दिवाळीनंतर वाजण्याची शक्यता असल्यामुळे भाजपकडून तयारी सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिका, नगर पंचायतींमधील निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र भाजपने तयारी पूर्ण केली आहे. भविष्यात होणारे पक्ष प्रवेशांवरही या बैठकांत किंवा खासगीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
खळबळजनक! पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला? सल्लागाराचा मोठा दावा…
भाजपने या आठवड्यात पाच विभागांसह मुंबईतील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचं नियोजन केलं असून प्रत्येक बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहून नेत्यांशी संवाद साधत आहेत. नाशिक व मराठवाड्यासंदर्भातील बैठक नाशिक येथे होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची शनिवारी व मुंबई येथे कोकण विभागाची बैठक होईल. भाजप पक्ष संघटनेकडून पूर्ण तयारी केली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.
स्वबळाचा नारा…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या महायुती म्हणून लढवण्यात येणार असल्याचं महायुतीतील घटकपक्षांच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत असलं, तरी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. पुणे महानगरपालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत गेल्या निवडणुकीत झाली होती. या निवडणुकीत भाजपने 100 जागा जिंकल्या होत्या. या परिस्थितीत महायुतीतील जागावाटप अडचणीचं असल्याने मुख्यमंत्र्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकीत स्वबळावर की महायुती म्हणून लढायचं, याचीही चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे.

