Crime News: जामखेड मोहो येथील रेणुका कलाकेंद्रात थरार नाट्य घडले. चार जणांच्या टोळक्याने कोयते घेऊन थेट स्टेजवर हल्ला केला. नर्तिकांवर हल्ला करत थिएटर मालकाकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली. थिएटरमधील साहित्य आणि नृत्यांगनांची दुचाकी फोडली. महिलांची छेडछाड केल्याचा आरोपही आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर (रा. आष्टी, जि. बीड) व अक्षय मोरे उर्फ चिंग्या (रा. जामखेड) हे चौघे जण कोयते घेऊन थिएटरमध्ये आले. त्यांनी थिएटर मालक अनिल पवार आणि त्यांचे पुत्र परशु व मोहित यांना खंडणी देण्याचा दबाव टाकत धमकावले. हल्ल्यात खुर्च्या, टेबल, आणि नृत्यांगनेची स्कूटी फोडण्यात आली, तर हस्तक्षेप करणाऱ्या ज्योती जाधव यांच्यावरही हल्ला झाला. शुभम लोखंडे याने त्यांचा ब्लाऊज फाडून धक्का दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी यापूर्वीही नवरात्रोत्सवाच्या बॅनरची तोडफोड करून, बीड रोडवरील हॉटेलमध्ये हल्ला केला होता. सतत धमक्या व खंडणी मागणीचे प्रकार सुरु असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पुढील तपास सुरू
आरोपी शुभम लोखंडे यांनीही प्रतिफिर्याद दाखल केली असून परशु पवार यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून जामखेड पोलिसांनी दोन्ही बाजूंचे गुन्हे दाखल केले असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर करत आहेत.

