• Mon. Mar 9th, 2026
    Amit Shah: अतिवृष्टीग्रस्तांना विनाविलंब भरीव मदत मिळेल; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा

    Amit Shah: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विनाविलंब भरीव मदत मिळेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अहिल्यानगर येथे केली.

    अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, अहिल्यानगर: अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महाराष्ट्र सरकारकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करील,’ अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी लोणी (जि. अहिल्यानगर) येथे दिली.

    लोणी प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व माजी केंद्रीय मंत्री डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण आणि कारखान्याच्या नूतीकरणाचा आरंभ शहा यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याबरोबरच कोपरगाव येथे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पाचे उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
    Maharashtra TimesManoj Jarange: ओबीसी मोर्चाच्या नावाखाली काँग्रेसचा फायदा; मनोज जरांगेंचा विजय वडेट्टीवारांवर आरोप
    या दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते.

    शहा म्हणाले, ‘राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बनिया नाहीत. मात्र, ते बनियापेक्षा कमी नाहीत. मला येथे पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी म्हणून बोलाविले आणि माझ्याकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली. त्यांनी प्रस्ताव द्यावा; सरकार तयार आहे. माजी अर्थमंत्री बाळासाहेब विखे यांनी गुजरातमधील २२५ बँकांना मदत केल्याची आठवण आजही आम्हाला होते.’

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी साखर कारखान्यांकडून पूरग्रस्तांसाठी कर कपातीवरून टीका करणाऱ्यांंचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘पूरग्रस्तांसाठी प्रतिटन पाच रुपये कपात शेतकऱ्यांना द्यायच्या एफआरपीतून नाही, तर कारखान्यांच्या नफ्यातून करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान कुठे आहे? ज्यांच्या जीवावर कारखाने चालतात त्यांच्यासाठी हे पाच रुपये देणे जड आहे का? शेतकऱ्यांचा खोटा कळवळा व्यक्त करणाऱ्यांनी याचा विचार करावा. उसाचे वजन करताना काटा मारून याच शेतकऱ्यांना लुटता, तो पैसा तुम्हाला कसा चालतो. अशा काटा मारणाऱ्या कारखान्यांची माहिती माझ्याकडे आली आहे, त्यांचा बेत आता पाहतो,’ असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
    Maharashtra Timesदसऱ्यानिमित्त आईसाठी दागिन घ्यायला गेले अन्…; व्यावसायिकासोबत धक्कादायक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज समोर
    या वेळी विखे पाटील कारखान्याच्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्यात आले. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आभार मानले.

    सीबीजीसाठी १५ कारखान्यांना साह्य
    अहिल्यानगर :
    ‘देशभरातील १५ सहकारी साखर कारखान्यांना कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि पोटॅश उत्पादनासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) अर्थसाह्य दिले जाईल,’ अशी माहिती अमित शहा यांनी कोपरगाव येथे दिली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या देशातील पहिल्या सीबीजी प्रकल्पाचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी शहा बोलत होते. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुपचे अध्यक्ष बिपिन कोल्हे उपस्थित होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा