मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात एका ५ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे, जो मुलाला मुंबईत घेऊन गेला होता.
२२ ऑगस्टला सूरतच्या अमरोली पोलीस ठाण्यात एक तक्रार देण्यात आली होती. मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली होती. हाच मुलगा ट्रेनमध्ये मृतावस्थेत सापडला. मुलाच्या मावस भावानं त्याचं अपहरण केल्याचा आरोप त्या तक्रारीत करण्यात आला होता. याच आधारावर अमरोली पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबर सर्व्हिलान्सवर ठेवून ट्रॅकिंग सुरु केलं आहे. मात्र अद्याप तरी आरोपीचा ठावठिकाणा सापडलेला नाही.
अमरोली पोलिसांचं पथक शनिवारी पहाटे चारच्या सुमारास लोकमान्य तिलक टर्मिनस परिसरात दाखल झालं. त्यांनी रेल्वे पोलिसांकडून मुलाची आणि आरोपीची माहिती घेतली. कुशीनगर एक्स्प्रेसमधून एका मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर मृतदेहाचा फोटो कुटुंबाला पाठवण्यात आला. हा फोटो अपहरण झालेल्या मुलाचाच असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. मुलाचा फोटो पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला.
आधी पोलिसांनी अपहरणाच्या दिशेनं तपास सुरु केला होता. मात्र हत्येमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. आरोपी चिमुकल्या मुलाला घेऊन मुंबईत कसा पोहोचला, त्याची हत्या कोणत्या परिस्थितीत झाली, या हत्येमागील कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
हत्या झालेल्या मुलाचं कुटुंब मूळचं बिहारचं आहे. ते रोजगारासाठी गुजरातच्या सूरतमध्ये स्थायिक झालं. या भयंकर हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलीस, रेल्वे सुरक्षा यंत्रणांकडून या हत्या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.

