सातारा शहरात एका अपार्टमेंटमध्ये चोरी करताना एका चोरट्याचा दुर्दैवी अंत झाला. वेदांत अरूडे नामक चोरटा इमारतीवरून पडून जागीच ठार झाला, तर त्याच्या साथीदाराला नागरिकांनी पकडून चोप दिला. तिसऱ्या साथीदाराला पोलिसांनी मंचरमध्ये अटक केली आहे. तिघांनी मिळून अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमधून ६ लाखांचा ऐवज चोरला होता.
वेदांत अरूडे, महेश मंगळवेढेकर आणि अभिजीत बिडकर या मंचरमधील तीन सराईत चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील वास्तू प्लाझा अपार्टमेंटची रेकी केली होती. शनिवारी मध्यरात्री त्यांनी चोरीचा बेत आखला. अभिजीत हा अपार्टमेंटच्या बाहेर थांबला तर वेदांत आणि महेश हे दोघेजण अपार्टमेंटमध्ये घुसले. त्यांनी दोन बंद फ्लॅटमधील ६ लाखांचा ऐवज चोरला. अपार्टमेंटमधील रहिवासी तथा सेवानिवृत्त जवानाला चाहूल लागल्याने ते घरातून बाहेर येताच वेदांत अरूडे याने त्यांच्या डोक्यात रॉड मारला. त्यानंतर घाईघाईत पाईपवरून उतरत असताना चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने तो जागीच ठार झाला. महेश मंगळवेढेकर याला नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला.
Kalyan News : खड्ड्यात पडला, हातावरून ट्रकचं गेलं चाक, २४ दिवस मृत्यूशी झुंज, स्वातंत्र्यदिनी रोहनची प्राणज्योत मालवली
अपार्टमेंटमधील गोंधळ पाहून बाहेर थांबलेल्या अभिजीत बिडकर, या तिसऱ्या चोरट्याने घटनास्थळावरून पलायन केले. सातारा शहर पोलिसांनी चाकण पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली.
दरम्यान, नागरिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या चोरट्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला अटक करता आली नाही. शवविच्छेदन करून वेदांत अरूडे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश गवळी अधिक तपास करत आहेत.

