Dhule News : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज अनपेक्षित घटना घडली. एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमधून संबंधित पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
साडेअकरा वाजेच्या सुमारास गोळी झाडल्याचा मोठा आवाज झाला आणि काही क्षणातच हवालदार सूर्यवंशी रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर आले. यावेळी तेथील काही तरुणांनी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने हिरे रुग्णालयात हलविले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने बाजार समितीच्या आवारात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांची घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डीवायएसपी राजकुमार उपासे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे पीआय निवृत्ती पवार, एलसीबी पीआय श्रीराम पवार तसेच शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. तर पीएसआय समाधान सुरवाडे, कॉन्स्टेबल विजय शिरसाठ यांनी पंचनामा केला
गोळी छातीला चाटून खिडकीबाहेर गेली
हवालदार सूर्यवंशी यांनी स्ट्राँग रुमच्या चौकीतच रायफलने स्वतःवर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या डाव्या छातीला चाटून रुमच्या खिडकीला छेदून बाहेर गेली. घटना घडली त्यावेळी त्यांची वर्दी शेजारीच टांगलेली होती. विश्रांतीसाठी असलेली गादीही रक्ताने माखलेली होती. तर रायफल एलईडी स्क्रीनजवळ ठेवलेली होती. झाडलेली गोळी शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. या चौकीत सीसीटीव्ही असून त्याचीही तपासणी केली जात आहे. तसेच घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते, हवालदार सूर्यवंशी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? यामागचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही.
दोनदा झाले होते निलंबन
पोलीस हवालदार उमेश सूर्यवंशी हे वाहतूक शाखेत कार्यरत असताना मे 2023 मध्ये लाच प्रकरणात त्यांना रंगेहाथ अटक झाली होती. त्याच दिवशी पोलीस अधीक्षकांनी त्यांना निलंबित केले होते. तेव्हापासून ते पोलीस मुख्यालयात जमा होते. तत्पुर्वी 7 जून 2008 रोजी एसआरपीएफ ग्रुप ६ मध्ये ड्युटीवर असताना मद्यपान केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. शिवाय इतर प्रकरणातही त्यांना एकूण 24 वेळा शिक्षा करण्यात आलेली आहे. त्यांना आता पोलीस मुख्यालयामार्फत स्ट्राँग रुममध्ये सुरक्षेची ड्युटी दिल्यानंतर ते कर्तव्य बजावत होते. मात्र, आज सकाळी त्यांनी स्वतःवर गोळी झाडली.
मुलाला केला फोन
रायफलची गोळी हवालदार उमेश सूर्यवंशी यांच्या डाव्या छातीला चाटून गेल्यानंतर ते रक्तबंबाळ झाले. तशाच अवस्थेत त्यांनी मुलाला फोन करुन सांगितले की, ‘मला गोळी लागली आहे’. त्यानंतर ते तशाच जखमी अवस्थेत चौकीबाहेर आले होते. त्यांच्या मुलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आझाद नगर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीसही लागलीच दाखल झाले होते. दरम्यान, हवालदार सूर्यवंशी यांची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती समोर येत आहे.

