• Sat. Mar 7th, 2026

    …तर कोडगेपणा तयार होईल! शिंदे, अजित पवारांशी संवाद साधताना CM फडणवीस इतकं टोकाचं का बोलले?

    …तर कोडगेपणा तयार होईल! शिंदे, अजित पवारांशी संवाद साधताना CM फडणवीस इतकं टोकाचं का बोलले?

    मागील काही दिवसांपासून महायुतीचे आमदार आणि मंत्री सातत्यानं वादात सापजत आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत चालली आहे. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील अनेक आमदार, मंत्री वादात सापडले आहेत. त्यांच्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे. महायुती सरकार गतिमान कारभार अशी जाहिरातबाजी सरकारकडून करण्यात आली होती. पण आता महायुती सरकार वादग्रस्त आमदार अशी सरकारची ओळख होऊ लागली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज असल्याचं समजतं. त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांकडे यासंदर्भात नाराजी व्यक्त करत कारवाईचे संकेत दिलेले आहेत.

    महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदार सातत्यानं वादात अडकत आहेत. त्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झाला आहे. सरकारच्या योजना आणि प्रकल्पांपेक्षा अधिक चर्चा त्यांच्या मंत्री आणि आमदार यांच्या घोटाळ्यांची आणि वर्तनाची होऊ लागली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मित्रपक्षांच्या मंत्री आणि आमदार यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल आणि वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

    काही निर्णय घ्यावेच लागतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलताना वादग्रस्त मंत्री आणि आमदारांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले. कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल. काहीही केलं तरी चालतं, असा समज मंत्री आणि आमदारांमध्ये निर्माण होईल, असं फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. त्यामुळे वादग्रस्त मंत्री आणि आमदार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

    शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड , मंत्री योगेश कदम, संजय शिरसाट , भरत गोगावले, अडचणीत सापडले आहेत. संजय गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशन सुरु असताना आमदार निवासातील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. जेवणाच्या निकृष्ट दर्जावरुन त्यांनी कँटिन कर्मचाऱ्याला बेदम मारलं. यानंतर मंत्री संजय शिरसाट वादग्रस्त ठरले. त्यांचा बेडरुममधील एक व्हिडीओ समोर आला. त्यात त्यांच्या शेजारी एक पैशानं भरलेली बॅग दिसली. शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटिसही आलेली आहे. भरत गोगावले अघोरी पुजेमुळे वादात सापडले आहेत.

    Eknath Shinde: गणेशोत्सवापूर्वी एसटी प्रवाशांना दिलासा, ३०% भाडेवाढ रद्द, एकनाथ शिंदेंची घोषणा

    दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिक कोकाटे सातत्यानं वादात अडकत आहेत. विधान परिषदेत ते रम्मी खेळत होते. त्यांचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना सातत्यानं वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा