• Fri. Mar 6th, 2026

    हवामान विभागाकडून रेड अलर्ट, भंडारा-गोंदिया जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका, शाळांना सुट्टी जाहीर

    हवामान विभागाकडून रेड अलर्ट, भंडारा-गोंदिया जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका, शाळांना सुट्टी जाहीर

    Red Alert For Bhandara and Gondia : विदर्भात मान्सूनच्या पुनरागमनामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागपूर, चंद्रपूरला ऑरेंज तर गोंदिया, भंडारा, गडचिरोलीला रेड अलर्ट जारी केला आहे. भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या धोक्यामुळे २५ जुलै रोजी शाळा, अंगणवाडी आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जितेंद्र खापरे, नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा मान्सूनने जोर धरला असून, संपूर्ण क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी काही जिल्ह्यांत धोक्याचे इशारेही हवामान विभागाने दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात २५ जुलै रोजी सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि महाविद्यालयांना सक्तीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रेड अलर्टच्या सूचनेनंतर हा प्रतिबंधक उपाय म्हणून आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुट्टी लागू राहणार आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालयाने काय म्हटलंय?

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेने प्रसिद्ध केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, हवामान खात्याच्या पूर्वसूचनेनुसार भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने २५ जुलै रोजीचा शैक्षणिक दिवस रद्द करण्यात आला आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी शैक्षणिक संस्थांनी करावी, असेही निर्देश दिले आहेत.गेल्या काही दिवसांपासून विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांमध्ये पुराचा धोका अधिक असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजेच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नद्या, नाले भरून वाहू शकतात. तसेच शहरी भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

    प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

    दरम्यान, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत २५ आणि २६ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट असल्याने, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी शासकीय सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा