Devendra Fadnavis on Online Fraud : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली की राज्यात ऑनलाईन फसवणूक वाढली आहे. सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले असून फसवणूक झालेल्यांपैकी अधिक रक्कम परत मिळवण्यात येत आहे. सरकारने सायबर सुरक्षा प्रकल्प सुरु केला आहे आणि पोलीस कर्मचाऱ्याना प्रशिक्षण दिले जात आहे. कुठल्याही सायबर गुन्ह्यात पैसे गेले असतील तर कोणत्या नंबरवर फोन केल्यास पैसे परत मिळवता येतील, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
“महापेमध्ये आता आपण अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. पुढच्या पाच वर्षात 5 हजार पोलिसांना सायबर प्रशिक्षित करत आहोत. आपण त्याला सायबर कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे. इतर राज्य देखील आपल्याकडे पाहून प्रकल्प करत आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘…तर पैसे कुठेही गेले असतील तर थांबवू शकतो’
“आता कुठल्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यात 1930 किंवा 1945 हा नंबर डायल केला तर तात्काळ आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अतिशय कमीत कमी वेळात ते पैसे कुठेही गेले असतील तर थांबवू शकतो, अशाप्रकारची व्यवस्था उभी केली आहे. यामध्ये डिजीटल फॉरेन्सिकची व्यवस्था केली आहे. कम्प्युटर रिस्पॉन्सची व्यवस्था केली आहे. सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर तयार केलं आहे. हॅकिंग रोखण्यासाठी सॉफ्टवेअर घेतलं आहे”, अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्रात साडेसहा टक्क्यांनी गुन्हेगारी घटली
“गुन्हेगारी वाढली आहे, असा आरोप अनेक सदस्यांनी केला. आकडेवारीने त्याचं विश्लेषण करणं हे खूप संवेदनशील वाटत नाही. 2024 ची तुलना केली तर 11,656 कमी झाले आहेत. याचा अर्थ 6.75 टक्क्यांनी गुन्हे कमी झाले आहेत. यामध्ये खून असेल, खुनाचा प्रयत्न असेल, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे सगळे गुन्हे कमी झाले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘अशाप्रकारे नागपूरला बदनाम करुन…’
“काही लोकांना मी गृहमंत्री असलो की नागपूरचीच आवड आहे. सुनील प्रभू का असं करताय? का नागपूरला बदनाम करताय? तुमची माहिती आणि आकडेवारी चुकीची आहे. नागपूरमध्ये गुन्हे वाढले नाहीत तर गुन्हेगारी कमी झाली आहे. राज्यात गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे साडेसहा टक्के आहे. पण नागपूरमध्ये गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे अकरा टक्के आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 581 गुन्ह्यांनी घट झाली आहे. प्रतिबंधात्मक कारवाईत नागपूरमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मी गृहमंत्री झाल्यानंतर नागपुरात गुन्हेगारी वाढली असं भासवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला ते चुकीचं आहे. नागपुरात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. अशाप्रकारे नागपूरला बदनाम करुन नागपूरची गुंतवणूक थांबावी, असं तुमच्या मनात नसेल, असं मी समजतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

