Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र आले तरी त्यांचे राजकीय सूर अजूनही पूर्णपणे जुळलेले बघायला मिळत नाहीत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना, राज्यातील अनेक नागरिकांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, असं वाटत असलं तरी ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या अद्याप एकत्र आलेले नाहीत. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.
“आम्ही 20 वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आलो. आम्ही पहिल्यांदा मराठी भाषेच्या विषयावर एकत्र आलेलो आहोत. मी तेव्हाच सांगितलं होतं की, आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. आम्ही मराठीच्या विषयावर एकत्रच राहणार आहोत. मुद्दा येतो तो पुढे राजकारणाचा. आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीय. ज्यावेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करु शकतो”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
“राज्याच्या विकासाऐवजी स्वत:चा विकास करतोय, असं ज्यांना वाटत असेल त्यांना वाटू द्या. मी माझ्या भूमिकेवर कायम आहे. आम्ही कोणत्या भाषेला विरोध करत नाहीत. पण सक्ती लागू करु देणार नाहीत”, अशी देखील प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना दिली.
‘मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न’
“मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. त्यासाठीच मुंबईत जेवढे उद्योग होते, वित्तीय कार्यालये होती, आर्थिक केंद्र होते ते सर्व गुजरातला कोण घेऊन गेलं? हीच लोकं घेऊन गेली ना? मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी वेगळं करु शकत नाही. जे कोणी तसं कृत्य करतील आम्ही त्याचे तुकडे करु. यासोबतच मुंबईचं महत्त्व कमी होऊ देणार नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचं हे महत्त्व काही लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतं. अहमादाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचं निर्माण कोण करत आहे? हे स्पेशल सांगण्याची आवश्यकता नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हनीट्रॅपच्या प्रकरणावर ठाकरेंची प्रतिक्रिया
“हनीट्रॅपमध्ये मी ऐकलं की 72 जण आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते आहेत. याबाबत सर्वांकडे अपूर्ण माहिती आहे. कुणाकडे पुरावे असतील, कारण हा खूप वाईट प्रकार आहे. जो या प्रकरणात असेल त्याला शिक्षा व्हायला हवी. महाराष्ट्रात असं रॅकेट चालू आहे तर जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. मी असं ऐकलं की, त्या ऑफिसरने त्या हॉटेलचे कॅमेरे फोडले. पण तो ऑफिसर आहे असं मी आज बोलू शकत नाही. कारण पुरावे नाहीत”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी पत्रकारांनी पेनड्राई्व्हचा प्रश्न विचारला असता, “आम्हाला पेनड्राईव्ह बघण्यात इंटरेस्ट नाहीत. जे पेनड्राईव्हमध्ये आहेत त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

