MNS Attack On Sushil Kedia : मुंबईत मराठी भाषेवरून वाद सुरू आहे. मनसेने एका मिठाई व्यावसायिकाला मारहाण केली. यानंतर गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी मराठी न शिकण्याची शपथ घेतली. त्यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले.
केडियानॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांचं कार्यालय मुंबईतील वरळीत आहे. राज ठाकरेंना आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या केडिया यांचं कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आलेलं आहे. त्यांच्या कार्यालयावर मनसैनिकांनी जोरदार नारळफेक केली. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त मनसैनिकांनी पोलिसांना न जुमानता केडिया यांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. यावेळी पोलिसांनी काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं.
शेअर बाजार तज्ज्ञ सुशील केडिया यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला pic.twitter.com/tRYYd4oFfN
— kunal.gavankar (@GavankarKunal) July 5, 2025
मराठी बोलणार नाही, केडियांची प्रतिज्ञा
मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या एका अमराठी दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिरारोडमध्ये मारहाण केली. यानंतर केडिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन काल एक पोस्ट केली. ‘मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट समजत नाही. जोपर्यंत तुमच्यासारख्यांना मराठी माणसांची देखभाल करण्याचा दिखावा करण्याची परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तशी प्रतिज्ञा मी घेतोय. काय करायचंय ते बोल?’, अशा शब्दांत केडिया यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं.
Do note @RajThackeray I dont know Marathi properly even after living for 30 years in Mumbai & with your gross misconduct I ahve made it a resolve that until such people as you are allowed to pretend to be taking care of Marathi Manus I take pratigya I wont learn Marathi. Kya…
— Sushil Kedia (@sushilkedia) July 3, 2025
कोण आहेत सुशील केडिया?
सुशील केडिया शेअर बाजार आणि गुंतवणूक तज्ज्ञ आहेत. २५ वर्षांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांसोबत काम करत आहेत. मार्केट टेक्निशियन्स असोसिएशनाच्या संचालक मंडळावर वर्णी लागलेले ते आशियातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी केडियानॉमिक्स नावाच्या रिसर्च फर्मची स्थापना केलेली आहे. शेअर बाजाराशी संबंधित सेवा देण्याचं काम ही कंपनी करते. सुशील केडिया अनेक बिझनेस चॅनेलवर पाहुणे म्हणून जातात. तिथे ते शेअर बाजार आणि गुंतवणूक विषयावर अधिकारवाणीनं बोलतात. मुंबईत राहणाऱ्या केडियांना हिंदी, इंग्रजीशिवाय बंगाली, गुजराती, मराठी भाषा अवगत आहे.

