• Mon. Jun 29th, 2026

    पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका

    पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका

    पुणे-प्रतिनिधी 

                             पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक ‘महायुती’कडून लढवण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून, त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसण्याची दाट शक्यता आहे. गत निवडणुकीत १६२ नगरसेवकांपैकी भारतीय जनता पक्षाचे ९७ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर त्यांच्या महायुतीतील नगरसेवकांची संख्याही घटल्याने जागा वाटपात त्यांना कितपत स्थान मिळणार, हा खरा चर्चेचा विषय ठरणार आहे.महापालिकेच्या गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे महायुतीत सर्वाधिक वाटा हा भाजपला, तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. शिवसेनेचे केवळ १० नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांना कमी जागांवर समाधान मानावे लागण्याची दाट शक्यता आहे. या दहा नगरसेवकांपैकी महायुतीमध्ये केवळ एकच नगरसेवक असल्याने शिवसेनेलाच जागावाटपात सर्वाधिक फटका बसणार आहे.
                          सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार २०२२ पूर्वीच्या परिस्थितीनुसार निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आगामी निवडणुका या महायुती एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. अपवादात्मक परिस्थितीतच स्वतंत्र निवडणूक लढवली जाईल. हा प्रचारही सकारात्मकपणे करून एकमेकांवरील टीका-टिप्पणी टाळण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ‘महायुती’च्या जागा वाटपात भाजपचाच वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका निवडणूक महायुतीतील घटकपक्षांकडून खरंच एकत्रित लढवली जाते का आणि जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *