• Mon. Sep 7th, 2026

पश्चिम बंगालचे सहाय्यक प्रणाली व्यवस्थापक अरुण गोराईन निलंबित – निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 17, 2025
पश्चिम बंगालचे सहाय्यक प्रणाली व्यवस्थापक अरुण गोराईन निलंबित – निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई – महासंवाद

मुंबई, १७ : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अरुण गोराईन, सहाय्यक प्रणाली व्यवस्थापक (ASM), काकद्वीप उपविभाग यांनी स्वपनकुमार हालदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), 131-काकद्वीप विधानसभा मतदारसंघ यांच्या लॉगिन तपशीलांमध्ये बेकायदेशीरपणे आपला मोबाईल क्रमांक समाविष्ट करून काही अर्ज निकाली काढले.

या प्रकरणी श्री.गोराईन यांना काकद्वीपचे एसडीओ आणि ईआरओ यांच्याद्वारे १७ मार्च २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर २४ मार्च २०२५ रोजी दिलेल्या उत्तरात त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे नमूद करून अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले. त्यांनी झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.

तथापि, त्यांनी अधिकृत परवानगीशिवाय दुसऱ्या अधिकाऱ्याच्या लॉगिनमध्ये आपला मोबाईल क्रमांक समाविष्ट करून त्यावर आलेल्या ओटीपीचा वापर करत फॉर्म क्रमांक ६, ७ आणि ८ वर कारवाई केल्यामुळे ही कृती फसवणूक आणि अप्रामाणिक हेतू दर्शवते. ही कृत्ये केवळ शासकीय कर्तव्यातील गंभीर निष्काळजीपणाच नव्हे तर जनप्रतिनिधित्व कायदा, १९५० च्या कलम ३२ अंतर्गत निवडणूक यादी तयार करण्याच्या कर्तव्यातील उल्लंघन देखील ठरते.

या अनुषंगाने, पश्चिम बंगाल सेवा (वर्गीकरण, नियंत्रण आणि अपील) नियम, १९७१ मधील भाग IV, नियम ७(१)(अ) नुसार श्री.गोऱाईन यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध मोठी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असून, त्यासाठी आवश्यक असलेले आरोपपत्र, साक्षीदारांची विधाने आणि संबंधित दस्तऐवज जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी, दक्षिण २४ परगणा यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

निलंबनाच्या कालावधीत श्री.गोराईन यांना त्यांच्या सेवा अटींनुसार निर्वाह भत्ता मिळेल, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed