Mumbai Dadar Chowpatty: समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्य बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. दोन्ही सैन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धुमश्चक्री सुरू आहेत. सीमेबरोबरच देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अशातच सर्वसामान्य नागरिकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत. सायबर पोलिसांच्या वतीने सोशल मीडियावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी पहाटे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन आला. साकीनाका येथील गैबन शाहबाबा दर्ग्याजवळ ड्रोन दिसल्याची माहिती देण्यात आली. हे ड्रोन जवळच्या झोपडपट्टीत गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेत साकीनाका येथील हा परिसर पिंजून काढला. मात्र ती केवळ अफवाच असल्याचे निष्पन्न झाले.
Nandurbar News : भावाच्या लग्नासाठी सुट्टीवर, कॉल आला अन् CRPF जवान भारतमातेच्या सेवेस रवाना, देशभक्तिपर गाणी लावत गावाकडून मिरवणूक
दादर चौपाटी येथे पोलिसांनी नागरिकांना बाहेर काढले. समुद्रमार्गे सुरक्षेचा धोका असल्याने नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यास मनाई केली जात असल्याचे वृत्त अनेक वाहिन्यांवर झळकले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन असेच कोणतेच आदेश देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे दादर चौपाटीवर नागरिकांची नेहमीप्रमाणे ये-जा असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी काय आवाहन केलं?
“सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्य बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका,” असं आवाहन मुंबई पोलिसांनी ‘एक्स’वरून केलं आहे.
दरम्यान, परळ येथील टाटा रुग्णालयास एक धमकीचा मेल आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने कळवल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. बॉम्बशोधक आणि नाशक पथक, श्वानपथकाच्या मदतीने पोलिसांनी रुग्णालयाची तपासणी केली. मात्र संशयास्पद असे आढळले नाही. धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

