• Thu. Mar 12th, 2026
    दृष्टिहीन पण निर्धाराने उजळलेलं यश; इम्तियाज खानची HSC मध्ये भरारी, वाचा प्रेरणादायी कहाणी

    Maharashtra HSC Result Success Story : अंधाराला हरवत प्रकाशाकडे झेप घेणं ही केवळ कल्पना नाही, तर दृढ इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीचं मूर्त स्वरूप आहे. हे साध्य करुन दाखवलं आहे ते इम्तियाज गुलाम खान याने. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत कला शाखेतून घवघवीत यश मिळवले आहे.

    (फोटो– Lipi)

    नागपूर : अंधाराला हरवत प्रकाशाकडे झेप घेणं ही केवळ कल्पना नाही, तर दृढ इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीचं मूर्त स्वरूप आहे. हे साध्य करुन दाखवलं आहे ते इम्तियाज गुलाम खान याने. जन्मतःच दृष्टिहीन असलेल्या इम्तियाजने आपली ही मर्यादा कधीच यशाच्या मार्गात अडथळा होऊ दिली नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत कला शाखेतून ७९.८३ टक्के गुण मिळवत, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गटात विभागात पहिला क्रमांक पटकावत त्याने एक नवा इतिहास घडवला आहे.

    इम्तियाजचं शिक्षणाचं हे यश आणखी महत्त्वाचं ठरतं कारण त्याच्या घरी कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. त्याची आई एक गृहिणी असून वडील पीओपी कामगार आहेत. घरात अभ्यासाचं पोषक वातावरण नव्हतं, ना कोणतं तांत्रिक साहाय्य. मात्र इम्तियाजने हार मानली नाही. त्याने आपल्या शिक्षणाचा आधार बनवला तो ऑडिओ बुक्सचा. मोबाईलमधून उपलब्ध होणाऱ्या ध्वनिमुद्रित अभ्याससामग्रीवर तो तासनतास अभ्यास करत असे.

    HSC Result Success Story : दृष्टिहीन पण निर्धाराने उजळलेलं यश; इम्तियाज खानची HSC मध्ये भरारी, वाचा प्रेरणादायी कहाणी

    या कठीण प्रवासात त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण त्याच्या मनात शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. “मी नेहमी स्वतःला हेच सांगत आलो की, अंधार हा अपयशाचा नाही, तर आव्हानांचा भाग आहे,” असं तो सांगतो. इम्तियाजच्या या यशामागे त्याच्या मित्रांचा, शिक्षकांचा आणि मार्गदर्शकांचा मोठा वाटा आहे. शिक्षकांनी वेळोवेळी ध्वनिमुद्रित स्वरूपात अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला, तर मित्रांनी तोंडी वाचन करत अभ्यासात मदत केली.

    आज इम्तियाज एका नव्या स्वप्नासाठी सज्ज आहे. त्याचं लक्ष्य वकील बनण्याचं आहे. सामाजिक न्यायासाठी लढणारा, आपल्या सारख्या इतर दिव्यांगांसाठी आवाज उठवणारा एक सक्षम वकील होण्याचं त्याचं स्वप्न आहे. यासाठी तो आता विधी शिक्षण घेण्यासाठी अर्ज करत आहे.

    इम्तियाजचं हे यश केवळ त्याचं वैयक्तिक विजयगीत नाही, तर हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं उदाहरण आहे. कमी साधनसंपत्ती असूनही जर दृढ इच्छाशक्ती असेल, तर कोणतीही मर्यादा यशाच्या वाटेवर अडथळा ठरू शकत नाही, हे इम्तियाजने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलं आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण समाजाकडून शुभेच्छा व्यक्त होत आहेत. अंधारावर मात करत यशाचं उजेड गाठणाऱ्या इम्तियाजसारख्या विद्यार्थ्यांमुळेच समाजात आशेचा किरण झळकतो.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *