• Wed. Jun 10th, 2026

    Bhiwandi Fire : भिवंडीत आगडोंब, चार मजली इमारत कोसळली, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या

    Bhiwandi Fire : भिवंडीत आगडोंब, चार मजली इमारत कोसळली, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या

    Bhiwandi Fire Breaks Out : भिवंडीतील राहनाळ गावात एका फर्निचर गोदामाला भीषण आग लागली, ज्यामुळे परिसरातील चार मजली इमारत कोसळली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान मागील 10 तासांपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आगीच्या धोक्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    ठाणे : भिवंडीत आगीची मोठी घटना घडली आहे. या आगीमुळे चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही. गेल्या 10 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण अग्निशामक दलाच्या जवानांना अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. या आगीमुळे चार मजली इमारत कोसळल्याचीदेखील माहिती मिळत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष म्हणजे प्रसंगावधान साधत पोलिसांनी आगीच्या आजूबाजूचा परिसर रिकामा केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

    भिवंडीतील राहनाळ गावात संबंधित घटना घडली आहे. राहनाळ गावात स्वागत कंपाउंडमधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत फर्निचरची 10 ते 15 गोदाम जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी भिवंडी, ठाणे अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झाल्या. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही आग धुमसलेलीच आहे. आग विझवताना अग्निशामक दलाचा जवान जखमी झाल्याती माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे या आगीची दाहकता किती भयानक असेल याचा अंदाज आपल्याला येईल.

    पहाटे चार वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत गोदामातील लाकडी प्लाउड, लाकडं आणि सोल्यूशनचा साठा जळून खाक झाला आहे. चार अग्मिशामक दलाच्या गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण पाण्याच्या कमतरतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे. आगीचे मोठे लोळ बघायला मिळत आहेत. तसेच धुराचे लोळ हे घटनास्थळापासून सुमारे 10 ते 15 किमी अंतरापासून दिसत आहेत. धुरामुळे स्थानिक नागरिकांना देखील आता त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे.

    या अग्नितांडवामुळे चार मजली इमारत कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या प्रकरणी आगामी काळात तपास केला जाण्याची शक्यता आहे. पण या आगीत मोठी वित्त हानी झाली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed