• Wed. Jun 10th, 2026
    Pune News: तळेगाव MIDCतील कंपनीत अनर्थ; काम करताना अचानक गॅस गळती, दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

    तळेगाव एमआयडीसीत भीषण दुर्घटना घडली आहे. कार्बन डायऑक्साइड गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. नेमकी कशी घडली ही घटना?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित कंपनीत मंगळवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कंपनीच्या प्लांटमध्ये कार्बन डायऑक्साइड वायूची गळती झाल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    मृत कामगारांची नावे गणेश उंबरे आणि वैभव थोरात अशी आहेत. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    कार्बन डायऑक्साइड गळतीने अनर्थ

    मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील एका विभागात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना दुपारच्या सुमारास कार्बन डायऑक्साइड वायूची गळती सुरू झाली. काही क्षणांतच परिसरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेत पाच कामगार वायूच्या संपर्कात आले.

    यातील गणेश उंबरे आणि वैभव थोरात हे दोघे अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने मदत करण्याचे प्रयत्न झाले, मात्र ऑक्सिजनअभावी आणि वायूचा परिणाम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

    Maharashtra TimesMHADA Redevelopment: उमरखाडीतल्या 81 जुन्या इमारती पडणार, म्हाडा उभारणार 40 अन् 81 मजल्यांचे 7 गगनचुंबी टॉवर्स, पण निवासी रहिवाशांना काय मिळणार?

    घटनेनंतर प्लांट रिकामा

    दुर्घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली. प्लांटमधील इतर कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच एमआयडीसी सुरक्षा विभाग, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

    जखमी कामगारांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

    तपासाला वेग

    दरम्यान, वायू गळती नेमकी कशामुळे झाली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा विभागाने तपास सुरू केला आहे. तांत्रिक बिघाड, यंत्रणेमधील त्रुटी किंवा मानवी चूक यापैकी कोणते कारण या दुर्घटनेमागे आहे, याचा तपास केला जात आहे.

    घटनेनंतर परिसरातील इतर उद्योगांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे तळेगाव एमआयडीसीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी जोर धरू लागली आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही कामगार संघटनांनी केली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा