Pune Crime News : पुण्यात कोंढवा परिसरात एका घरावर अज्ञात व्यक्तीने एअरगनने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. मनोज कानडे यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी तत्परतेने तपास करत बिलाल शेख नावाच्या आरोपीला एअरगनसह ताब्यात घेतले, त्यानेच हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. कोंढवा येथील सर्व्हे नंबर 63 शालिनी कॉटेज प्लॉट नंबर 25 साळुंखे विहार येथे मनोज श्रीकांत कानडे (वय 50 वर्षे) हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरावर काल अचानक अज्ञात इसमाने चार राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मनोज कानडे यांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन दिली. त्यांच्या या तक्रारीची पोलिसांकडून तातडीची दखल घेण्यात आली.
पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या कशा आवळल्या?
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक रऊफ शेख आणि तपास पथक तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. यावेळी मनोज कानडे यांच्या खालच्या घराच्या किचनच्या खिडकीवर एक खड्डा पडल्याचं बघायला मिळालं. ही घटना म्हणजे राऊंड फायर असल्याची संभाव्यता व्यक्त करण्यात आली.
पोलिसांनी तपास केला असता, पहिल्या मजल्यावर स्वयंपाक घराच्या खिडकीवर चार खड्डे पडल्याचे दिसले. पोलिसांनी सखोल तपास केला. फायरिंग नेमकी कोणत्या दिशेला झाली याचा अंदाज घेतला. यावेळी पोलिसांनी परिसरात तपास केला. पोलीस गोळीबाराची दिशा शोधत समोरच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर गेले. रोषमा रेजन्सी फ्लॅट नंबर दोन असा तिथला पत्ता आहे.
पोलिसांनी तपास केला असता तिथे 29 वर्षीय बिलाल जुल्फीकार शेख नावाचा तरुण राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याची चौकशी केली. यावेळी त्याने पोलिसांकडे आपल्या कृत्याची कबुली दिली. आपण एअरगनच्या मदतीने पाच छरे फायर केल्याचे त्याने सांगितले. घटनास्थळी तुटलेल्या छर्राचे दोन तुकडे सापडले आहेत. आरोपी बिलाल यास एअरगनसह ताब्यात घेण्यात आलं. त्याला कोंढवा पोलीस ठाणे येथे घेऊन जाऊन पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अब्दुल रऊफ शेख यांनी दिली.
