• Thu. Jun 11th, 2026

    8 वर्षांनंतर ‘नियो मेट्रो’ रद्द, मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये नियमित मेट्रोचा विचार; मंत्रालयात बैठक

    8 वर्षांनंतर ‘नियो मेट्रो’ रद्द, मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये नियमित मेट्रोचा विचार; मंत्रालयात बैठक

    Nashik Neo Metro: नाशिकमधील मेट्रो निओचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. तो रद्द केल्यानंतर आता नियमित मेट्रोसाठी चाचपणी सुरू झाली असून बुधवारी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिकमधील प्रस्तावित ‘टायरबेस्ड मेट्रो निओ प्रकल्प’ आता जवळपास गुंडाळण्यात आला असून, ‘टायरबेस्ड मेट्रो निओ’ऐवजी आता नियमित मेट्रोची चाचपणी सुरू झाली आहे. शहरात मेट्रोसाठी आवश्यक प्रतितास २० हजार प्रवासी संख्येचा आकडा पार झाला आहे. त्यामुळे ‘टायरबेस्ड मेट्रो निओ’ऐवजी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या धर्तीवर नाशिकमध्येही पारंपरिक मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी बुधवारी (दि. १०) नगरविकास विभागचे अवर सचिव यांच्याकडे बैठक बोलविण्यात आली आहे.

    नगरविकास विभागाचे अवर सचिव यांनी याबाबतचे पत्र महापालिकेसह संबंधित यंत्रणांना पाठविले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये नियमित मेट्रो होण्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मेट्रो शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने सर्व महापालिकांना स्वतंत्रपणे वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    Maharashtra TimesMumbai Metro: मान्सूनमध्ये सुरु राहणार मुंबईतील चारही मेट्रो सेवा, पाच गाड्या राखीव ठेवणार; बिघाड टाळण्यासाठी उपाययोजना

    आठ वर्षांपासून मेट्रो रखडली

    नाशिक महापालिकेचा पहिला सर्वंकष वाहतूक आराखडा सन २०१६ मध्ये तयार करण्यात आला. त्यावेळी पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, रस्ता विकास, मालवाहतूक, तंत्रज्ञान व रहदारी अभियांत्रिकी धोरणाचा समावेश करीत ‘अर्बन मास ट्रान्झिट’ या दिल्ली (युएमटीसी) स्थित कंपनीने सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यातूनच शहरात सिटीलिंक कंपनीची बस सेवा सुरू झाली. त्या आराखड्याचाच आधार घेऊन पुढे नाशिकसाठी ‘टायरबेस्ड मेट्रो निओ’ची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी २,१०० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. परंतु, गेल्या आठ वर्षांपासून ही मेट्रो प्रत्यक्षात आली नसल्याने आता नियमित मेट्रोचा विचार सुरू झाला आहे.

    ‘महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशन टायरबेस मेट्रो’ऐवजी नियमित मेट्रोच्या अनुषंगाने नाशिक शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सदरचा नाशिक शहराचा आराखडा ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ या संस्थेकडे सादर करण्यात आला. यानुसार आता ‘टायरबेस्ड मेट्रो’ऐवजी मुंबई, पुणे, नागपूरच्या पारंपरिक मेट्रोसाठीची चाचपणी नाशिक शहरात सुरू करण्यात आली आहे.

    Maharashtra TimesMumbai News: नव्या पुलावर निकृष्ट दर्जाचे काँक्रीट, खडी व माती पसरलेली, पण महापालिकेकडून भलतंच उत्तर, मृणालताई गोरे पूल चर्चेत

    …यांची असणार उपस्थिती

    नियमित मेट्रोसाठी नगरविकास विभागाचे अवर सचिव अजयसिंग पाटील यांनी आज, बुधवारी होणाऱ्या बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे ‘एमडी’ यांना ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत नियमित मेट्रो प्रकल्पाबाबत विचार केला जाणार असून, त्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. गत आठ वर्षांपासून नाशिककरांना ‘टायरबेस्ड मेट्रो निओ’च्या आशा दाखविण्यात आल्या होत्या. त्यात आता ‘नियमित मेट्रो’ची चाचपणी सुरू झाल्याने नाशिककरांच्या वाट्याला नेमकी कोणती मेट्रो येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    अशी आहे मेट्रोसाठी अट

    मेट्रोसाठी तासाला २० हजार प्रवासी मिळणे अपेक्षित आहे. परंतु, नाशिकमध्ये प्रतितास चौदा हजार प्रवासी मिळत असल्याने ‘टायरबेस्ड मेट्रो’चा पर्याय निवडण्यात आला. परंतु, ‘निओ मेट्रो’ला उशीर झाल्यानंतर ‘टायरबेस्ड मेट्रो’ऐवजी नियमित मेट्रोसाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी ‘महामेट्रो’ने नाशिकचा वाहतूक आराखडा तयार केला असून, त्यात नाशिकमध्ये प्रतितास २० हजार प्रवासी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हा आराखडा आता नगरविकास मंत्रालयात सादर केला असून, त्यानुसार नियमित मेट्रोची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा