CM Devendra Fadnavis on Raj-Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाशी हातमिळवणी करण्यासाठी पहिली साद घातली आहे. यावर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘बघा जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचे कारण नाही. फक्त मला वाटतं की, माध्यमं त्यावर जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट बघा. ते एकत्र आले तर उत्तम आहे. आम्ही स्वागत करू,’ असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray And Raj Thackeray: ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा; उद्धवसेनेकडून दोन भावांचा खास फोटो पोस्ट, युती होणार?
दरम्यान एकनाथ शिंदें मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर मात्र संतापल्याचे पाहायला मिळाले. ते सध्या साताऱ्यातील आपल्या मूळगावी आहेत. येथे त्यांना युतीबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी काय रे तू म्हणत एका खाजगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा माईक दूर केल्याचे पाहायला मिळाले. तेथून उत्तर न देताच निघून गेले.
युतीची नेमकी चर्चा काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत दोन्ही ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यावर प्रश्न विचारण्यात आला. प्रत्युत्तरात राज ठाकरेंनी, ‘आमच्यातली भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र मात्र मोठा आहे.’ असे म्हणत युतीसाठी साद घातल्याचे दिसते. यावर उद्धव ठाकरेंनीही कामगार सेनेच्या कार्यक्रमातून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘माझ्याकडून सगळी भांडणं मिटली. पण माझी एक अट आहे. माझ्यासोबत येऊन हित आहे की, भाजपसोबत जाऊन हित आहे, ते आधी ठरवा,’ असे ठाकरे म्हणाले. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही एकत्र येण्याचे आवाहन केले. शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स हँडलवर देखील दोन्ही भावांचा हस्तांदोलन करतानाचा एकत्र फोटो शेअर करत युतीचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

