• Thu. Mar 19th, 2026

    Dhananjay Munde : ‘मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून…’, धनंजय मुंडे यांचा मोठा खुलासा

    Dhananjay Munde : ‘मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून…’, धनंजय मुंडे यांचा मोठा खुलासा

    Dhananjay Munde Health Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची बातमी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्याने खळबळ उडाली. मात्र, मुंडे यांनी स्वतः या वृत्ताचे खंडन केले आहे. दीड महिन्यांपूर्वी बेल्स पाल्सी या आजाराने त्रस्त असून चेहऱ्यावर परिणाम झाल्याने बोलण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाटील यांनी काळजी व्यक्त केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत आज महत्त्वाची माहिती समोर आली. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता, अशी माहिती दिली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. अनेकांना धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाटत होती. “धनंजय मुंडे यांची तब्येत ठीक नाही. त्यांना पॅरेलेसिस झालाय. त्यांना बोलताही येत नाही. डोळे देखील वाकडे झाले आहेत”, असं बाबासाहेब पाटील म्हणाले होते. पण यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्याला अर्धांगवायू झालेला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

    धनंजय मुंडे काय म्हणाले?

    “आमचे सहकारी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो. बाबासाहेब पाटील यांची आणि माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

    “मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे. त्याचा आणि इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होत असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही”, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं.

    बाबासाहेब पाटील नेमकं काय म्हणाले होते?

    बीडच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर राहिल्याचा प्रश्नाला उत्तर देताना बाबासाहेब पाटील यांनी त्यांना पॅरेलेसिस झाल्याचं सांगितलं होतं. “धनंजय मुंडे यांची तब्येत ठीक नाही. त्यांना पॅरेलेसिस झालाय. त्यांना बोलताही येत नाही. डोळे देखील वाकडे झाले आहेत. आपण दुसरंच बघतो. ते मुंबईला देखील बैठकीला येतात. ते फॅशन शोला दिसले असतील. जवळच्या माणसाने आग्रह केला असेल. त्यामुळे गेले असतील”, असं बाबासाहेब पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed