नागपुरात एक तरुण हा चक्क टॉवरवर चढला. यानंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाली. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले. अखेर चार तासांच्या अभूतपूर्व नाट्यानंतर तरुणाला खाली उतरवण्यात आलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : पालकांसोबत झालेला वाद, मानसिक समस्या आणि प्रॉपर्टीसंबंधित नुकसानीमुळे आलेल्या मानसिक तणावातून एका तरुणाने नागपुरातील अहिंसा चौक, आमदार निवासाजवळील मोबाईल टॉवरवर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी या तरुणाला सुरक्षितपणे टॉवरवरून खाली उतरवले. किशोर ऊर्फ मोनी सिन्हा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
नेमंक काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण छत्तीसगडमधून नागपुरात आला होता. अहिंसा चौक परिसरातील मोबाईल टॉवरवर तो अचानक चढल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही वेळातच ही माहिती परिसरात पसरली आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी टॉवरकडे पाहण्यासाठी गर्दी केल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली.
पोलीस, अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन विभागाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र, जवान त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताच तो त्यांच्यापासून दूर जात होता. त्यामुळे त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरत होते.
Dighi Shipbuilding Cluster : देशात सर्वात मोठं शिपयार्ड दिघी पोर्टवर उभारणार, 27 हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
पोलिसांकडून तरुणाला विश्वासात घेण्याचे प्रयत्न
टॉवर उंच असल्याने तरुण नेमके काय बोलत आहे, हे खाली असलेल्या पोलिसांना स्पष्टपणे समजत नव्हते. त्याची मानसिक स्थितीही अस्वस्थ असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधून त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.
तरुणाला समजावण्याचा प्रयत्न
संबंधित तरुण छत्तीसगडमधील असल्याने त्याच्याशी संवाद साधण्यासाठी छत्तीसगडी भाषा बोलणाऱ्या काही नागरिकांचीही मदत घेण्यात आली. त्यांनी तरुणाशी त्याच्याच भाषेत संवाद साधत त्याला खाली येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. एकीकडे अग्निशमन जवान रेस्क्यूची तयारी करत होते, तर दुसरीकडे पोलीस आणि नागरिक त्याची समजूत काढत होते.
Shiv Sena Hearing : शिंदेंच्या वकिलांकडून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा, शिवसेनेच्या सुनावणीत अभूतपूर्व ट्विस्ट, वाचा A टू Z युक्तिवाद
चार तासांच्या प्रयत्नानंतर तरुण खाली उतरला
सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील चौकशीसाठी अंबाझरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
तरुण मानसिक तणावात का होता?
प्राथमिक चौकशीत तरुणाच्या मानसिक तणावामागे काही वैयक्तिक कारणे असल्याचे समोर आले आहे. त्याचे पालकांसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. त्याचबरोबर प्रॉपर्टी संबंधित काही नुकसान झाल्याने तो तणावाखाली होता. या वैयक्तिक समस्यांमुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच नागपुरात आल्यानंतर त्याचे काही सामान चोरीला गेल्याची माहितीही प्राथमिक तपासात समोर आली आहे
Heavy Rain Forecast : कमी दाबाचा पट्टा, नंतर चक्रीवादळ, सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज
पोलीस कारवाई करणार?
सध्या तरुण कोणत्याही प्रकारे सविस्तर बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याऐवजी प्रथम त्याची मानसिक अवस्था समजून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याशी शांतपणे संवाद साधून टॉवरवर चढण्यामागील नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तरुणाला आवश्यक मदत केली जाणार, पोलिसांची माहिती
गरज भासल्यास भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, त्यापूर्वी तरुणाची मानसिक स्थिती समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला मानसिक त्रास असल्याचे स्पष्ट झाल्यास स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अंबाझरी पोलीस करत असून, तरुणाने नेमक्या कोणत्या परिस्थितीत टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला आणि त्यामागे आत्महत्येचा प्रयत्न होता काय..? याचाही तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा