Pune PMPML Bus News : पुण्यात आज सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. PMPML च्या बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते. या दरम्यान अशी घटना घडली की, यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस देहुरोड परिसरातून प्रवाशांना घेऊन जात असताना टायरमधून अचानक धूर निघाल्याचे पाहायला मिळले. मात्र, काही क्षणांतच आग भडकली. चालकाने तात्काळ बस थांबवून बसमधील 35 प्रवाशांना खाली उतरवले. स्थानिक नागरिकांनी धैर्य दाखवत जवळपास उपलब्ध अग्निशमन यंत्रांचा वापर केला आणि आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळवले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
पीएमपीएमएल प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, टायरमधील तांत्रिक बिघाड किंवा घर्षणामुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रवाशांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली असून, बसच्या नियमित देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या घटनेनंतर पीएमपीएमएलने सर्व बसच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली, तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, प्रसंगावधानामुळे आज मोठी दुर्घटना सुदैवाने टळली आहे. सर्वसामान्य नागरीक हे दररोज PMPML च्या बसने प्रवास करतात. त्यामुळे प्रशासनाकडून या बसेसची काळजी घेणं आवश्यक आहे. बसमध्ये कोणतीही तांत्रिक बिघाड असेल तर ती ताबडतोब दुरुस्त देखील करणं अपेक्षित आहे. याशिवाय दररोज हजारो प्रवासी या बसने प्रवास करतात. त्यामुळे बसेसची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे. दरम्यान, आज अपघात झालेल्या बसची सर्व्हिसिंग झाली नव्हती का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

