राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये सरकार विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी रोहित पवार यांच्या मते या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी’ आणि ‘त्रुटी आहेत. सरकारच्या चालू योजनांचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरसकट कर्जमाफीची मागणी रोहित पवारांनी लावून धरली आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून रोहित पवार यांचे आई वडिल, बहिण, पत्नी आणि मुलं आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. सलग तीन दिवसांच्या उपोषणामुळे रोहित पवार यांची प्रकृती खालावली आहे. रोहित पवारांचं बीपी आणि शुगर लो झाल्यामुळे त्यांनी सलाइन लावावं अशी विनंती डॉक्टरांनी केली आहे. दरम्यान रोहित पवार यांनी सलाइन न लावण्याचा निर्णय घेतला आहे. गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर पुढील निर्णय घेऊ असं रोहित पवार म्हणाले. दरम्यान रोहित पवार यांची अवस्था पाहून त्यांच्या लेकीच्या अश्रूचा बांध फुटला. रोहित पवार यांच्या पत्नी आणि आईच्या डोळ्यांत देखील अश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं.