Satara News : सातारा शहरात आज भरदिवसा तीन अज्ञात चोरांनी डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून धाडसी चोरी केली आहे. चोरट्यांनी डॉक्टरच्या घरातील लाखोंचा ऐवज लांबवला आहे.
घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसवड येथे सातारा-पंढरपूर महामार्गालगत नानाज ढाब्याच्या पाठीमागे डॉ. खरात हॉस्पिटलशेजारी डॉ. नरेंद्र पिसे यांचा मध्यवर्ती ठिकाणी बंगला आहे. आज भरदिवसा दुपारी पावणे दोनच्या सुमारास तीन अज्ञात बुरखाधारी चोरांनी बंगल्यात प्रवेश केला होता.
यावेळी डॉ. नरेंद्र पिसे व त्यांचा मुलगा डॉ.आकाश पिसे दवाखान्यात गेले होते. त्यावेळी डॉ. पिसे यांच्या सुनबाई व लहान बाळ घरी होते. दुपारी चोरांनी बंगल्यात प्रवेश करून डॉक्टरांच्या सुनेला व लहान बाळाला एका रुममध्ये कोंडून ठेवले. याची जाणीव होताच त्यांनी त्यांच्या पतीला फोन लावला आणि विचारले, की तुम्ही घरी आला आहे का? त्यावेळी त्यांच्या पतीने सांगितले की, मी घरी आलो नाही.
पत्नीला संशय येताच त्यांनी डॉक्टर पतीला सांगितले की, घरात कोणीतरी घुसले आहे. ती महिला रुमच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर येऊन बंगल्याचा मुख्य दरवाजा बंद केला. पती-पत्नीचे मोबाईलवरील संभाषण त्या चोरांनी ऐकले होते. चोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते; परंतु मुख्य दरवाजा बंद होता. चोर पाठीमागील दरवाजातून बाहेर आले. त्याचवेळी त्या महिलेने चोरांच्या गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरांनी बंदुकीचा धाक दाखवला आणि तेथून पसार झाले. यामुळे शहरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती समजताच म्हसवड पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली अन् दरोडेखोरांचे वर्णन व गाडीचा शोध सीसीटीव्ही टीव्हीच्या माध्यमातून सुरू केला. घटनास्थळी श्वान पथक आणि तसेच तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.