मुंबई, दि. 15 – कामगारांनी कोणत्या संघटनेसोबत काम करावे याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बॉम्बे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सर्व कामगार संघटनांशी चर्चेची भूमिका घ्यावी, असे निर्देश कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.
मंत्रालयात बॉम्बे रुग्णालयातील रुग्णसेविका आणि कामगार यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी राज्यमंत्री श्री.जयस्वाल बोलत होते. याबैठकीस राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर, बॉम्बे रुग्णालयाचे व्यवस्थापक राजन चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कामगार आयुक्तालयाचे अधिकारी उपस्थित होते.
कामगार आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या सोबत एकत्रिक बैठक घ्यावी अशा सूचना देऊन राज्यमंत्री श्री.जयस्वाल म्हणाले की, भविष्यात रुग्णसेवकांबाबत कोणत्याही तक्रारी होणार नाहीत याची रुग्णालय प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच यावेळी बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्ट, मुंबई येथे रुग्णांना देण्यात येणाऱ्या 10 टक्के सवलतीच्या बेडचा दुरूपयोग होत असल्याबाबतही आढावा घेण्यात आला. याबाबत समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी दिल्या.
यावेळी विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, अवर सचिव स.द .कस्तुरे, धर्मादाय सहआयुक्त सुनीता तरार, बॉम्बे हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय प्रतिनिधी व सरचिटणीस स्थानिक कमिटी दीपक जामदार उपस्थित होते.
00000
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ