मुंबई, दि. १४ : राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांच्या निधनाने शासन आणि अधिकारी-कर्मचारी यांच्यातील सुसंवादाचा महत्त्वाचा दुवा हरपला आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळ नेतृत्व करताना त्यांनी अनेक प्रश्न कौशल्याने, यशस्वीपणे सोडविले. शांत, संयमी, परंतु महत्त्वाच्या मुद्द्यांवर कणखर भूमिका घेणारे नेते ही त्यांची ओळख सातत्याने ठळक होत गेली.
शासकीय सेवेतून निवृत्तीनंतरही दिवंगत कुलथे हे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करीत राहिले. राज्य शासकीय राजपत्रित अधिकारी संघाचे त्यांनी प्रदीर्घकाळ नेतृत्व केले. या काळात प्रशासनात पारदर्शकता, संवेदनशीलता, जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराला बळी पडू नये, सचोटीने वागावे, यासाठी प्रबोधनावर भर दिला. त्यांच्या नेतृत्वात सुरू झालेली ‘पगारात भागवा’सारखी चळवळ अनोखी ठरली.
ग. दि. कुलथे यांच्या निधनाने अभ्यासू, ध्येयनिष्ठ, कर्मचारीप्रिय नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
—-०००००—-