नागपुरात एका धक्कादायक घटनेत, शासकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अर्चना राहुले यांचा त्यांच्या पतीने भावाच्या मदतीने खून केला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून अनिल राहुले यांनी भाऊ राजू सोबत मिळून हा कट रचला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनीकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांपासून अनिल हा अर्चनाच्य चारित्र्यावर संशय घ्यायला. त्यांना मारहाण करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने अर्चना यांना ठार मारण्याची धमकी दिली. ही बाब अर्चना यांनी बहीण डॉ. निमा सोनारे (वय ४३) यांना सांगितली. अर्चना आणि अनिल यांच्यातील वाद विकोपाला गेला. अखेर अनिलने भाऊ राजूच्या मदतीने अर्चनाचा खून करण्याचा कट आखला. ९ एप्रिलला तो भावासह घरी आला. अनिलने अर्चनासोबत वाद घातला. त्यानंतर अनिलने अर्चनाचे पाय पकडले. राजूने लोखंडी रॉडने अर्चनाच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात अर्चना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सेंट्रल लॉक लावून दोघेही तेथून पसार झाले.
अशी उघडकीस आली घटना
शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अनिल हा घरी आला. त्याला अर्चना या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. मृतदेह कुजलेला होता. त्याने धायमोकलून रडायला सुरुवात केली. शेजारी जमले. एका शेजाऱ्याने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला.
घराची तपासणी केली असता चोरीच्या उद्देशातून अर्चना यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान अनिल याने बेशुद्ध होण्याचे नाटक केले. अनिल यानेच अर्चनाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. कसून चौकशी केली असता भावाच्या मदतीने खून केल्याचे त्याने मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी अनिल आणि राजूला अटक केली. त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.