Nandurbar Thief Viral Letter : नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यातील एका बियर बारमध्ये एका अनोख्या चोराची चर्चा आहे. या चोरट्याने बारमध्ये मनसोक्त दारू पिऊन, जाताना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ‘परिस्थितीमुळे मी चोर बनलो, माझी कुणाशी दुश्मनी नाही,’ असं म्हणत त्याने पोलीस आणि समाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
तळोदा शहरातील एका बियर बारमध्ये शुक्रवारी रात्री प्रवेश केला. त्यानंतर तेथे मनसोक्त मद्याचा आनंद लुटला. व जाता जाता लिहिलेले हे एक भावनिक पत्र आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात या मद्यपी चोरट्याने लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर वायरल झाले असून हा प्रकार चांगला चर्चेचा विषय ठरत आहे.
तळोदा शहरानाजिक अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चिनोदा चौफुली नजिक असणाऱ्या “हॉटेल सोनेरी परमिट रूम अँड बियर बार मध्ये शुक्रवारी रात्री एका अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. चोरटा इतर गोष्टी चोरी करण्यापेक्षा त्याने बियर बार मध्ये बसून मनसोक्त मद्याचा आनंद लुटत दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या. मात्र मद्याची नशा चढल्यानंतर छोट्याने एक अफलातून प्रकार केला. त्याने दुकान मालक व पोलिसांसाठी तत्त्वज्ञानाने भरलेले भावनिक पत्र लिहिले. पत्रात त्याने स्पष्ट केलं की त्याची कुणाशीही जाती दुश्मनी नाही, पण परिस्थितीने त्याला चोर बनवलं. “माझी हालतच बेबस आहे,” असं लिहून त्याने समाजाचं आणि पोलीस यंत्रणेचं थेट आत्मपरिक्षण करायला लावणारे प्रश्न उपस्थित केले. “पोलीस खरंच इमानदार असतात का?” आणि “खराखुरा चोर कोण? जो चोरतो, की जो चोर बनवतो?” या पत्रात त्याने स्वतःचं जीवन चित्रपटासारखं असल्याचं नमूद केलं असून, “पैशांवर माणूस प्रेम करतो” अशी उपरोधिक टीकाही केली. एवढंच नव्हे तर 1999-2001 दरम्यान शहादा येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा पत्ताही विचारला. सध्या या चोरट्याचे दारू पिऊन लिहिलेले तत्त्वज्ञानाने भरलेले पत्राची जिल्ह्यात चर्चा आहे. त्याच्या पत्रामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.