Shri Vitthal Rukmini Temple in London : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची महती आता जगभर पोहोचणार आहे. लंडनमध्ये भव्य मंदिर उभारले जाणार असून, त्यासाठी १५ एप्रिल २०२५ रोजी पंढरपूरहून आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. ७० दिवसांत २२ देशांमधून १८,००० किमीचा प्रवास करत ही दिंडी विठ्ठल भक्तीचा संदेश जगभर पोहोचवणार आहे.
ही दिंडी १६ एप्रिलला नागपूरमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता ‘विष्णू जी की रसोई’, बजाजनगर येथे पालखी सर्वांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतातील या उपक्रमाचे समन्वयक म्हणून विष्णू मनोहर यांच्यासोबत एलआयटी विद्यापीठाचे प्रधान सल्लागार तथा व्यवस्थापन तज्ज्ञ मोहन पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिंडीचा प्रवास सुमारे ७० दिवसांचा असून २२ देशातून सुमारे १८,००० किमी प्रवास करणार आहे. यामध्ये नेपाळ, चीन, रशिया, विविध युरोपीय देशांचा समावेश आहे. दिंडीत विठ्ठलाच्या पादुका घेऊन जाण्यात येणार असून, यामागील विचार म्हणजे वारकरी परंपरेतील भाविकांनी जसे पायी वारी करून भक्तीचा अनुभव घेतला आहे, तसाच अनुभव जगभरात पोहोचवायचा आहे.
या उपक्रमासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि चैतन्य उत्पात यांचे सहकार्य लाभले आहे. याशिवाय या महत्त्वाच्या उपक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार उदयनराजे भोसले, एमआयटीचे विश्वनाथ कराड आणि अनेक वारकरी संप्रदायांच्या प्रमुखांनी शुभेच्छा दिल्या असून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासनही दिले आहे.
या भाविक दिंडीला यूकेमधील ४८हून अधिक मराठी मंडळे, तसेच आखात, जर्मनी, आयर्लंड, अमेरिका येथील मराठी संस्था जोडल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे, तमिळ, गुजराती, कानडी व तेलुगू भाविकही या उपक्रमात सहभागी होणार असून, ते अभंग म्हणू शकतात, हे विशेष आहे. पंढरपूरची ही ७०० वर्षांहून अधिक जुनी वारकरी परंपरा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे. या प्रसंगी विठ्ठल पाटील यांनी १ किलो चांदी देऊन शुभेच्छा दिल्या, तर प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनीही आपले संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. या ऐतिहासिक दिंडीच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा सुगंध संपूर्ण जगभर दरवळणार आहे.

