• Mon. Jun 15th, 2026
    ‘आता मुंढे साहेबांची बदली मान्य नाही’; भेसळखोरांविरोधातील मुंढे पॅटर्नला शेतकऱ्यांचा सलाम, प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

    Tukaram Mundhe Milk Abhishek News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक घातला आहे. अहिल्यानगरमधील खेड या गावातील नागरिकांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्याप्रती आनंदाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ही कामगिरी सुरुच ठेवावी, अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : राज्यातील दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने उघडलेल्या मोहिमेला आता शेतकऱ्यांचा उघड पाठिंबा मिळू लागला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत अनोखे आंदोलन केले. राज्यात अनेक वर्षांपासून बनावट आणि भेसळयुक्त दुधाचा काळाबाजार फोफावत असल्याने प्रामाणिक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र मुंढे यांनी सुरू केलेल्या कठोर कारवाईमुळे भेसळखोरांवर वचक निर्माण झाला असून, शुद्ध दुधाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

    ‘मुंढेंची बदली करु नये’

    भेसळयुक्त दूध बाजारातून हद्दपार झाल्यास शुद्ध दुधाची मागणी वाढेल आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे दुधाचे दरही सुधारतील असे मत शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांची या विभागातून बदली करू नये, अशी जोरदार मागणी केली. भेसळखोरांविरोधातील मोहीम अर्धवट राहू नये. सरकारने मुंढे यांना पूर्ण पाठबळ द्यावे. अन्यथा राज्यभर आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. भेसळखोरांविरोधातील कारवाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, शुद्ध दुधासाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत,असा संदेश खडकीतील शेतकऱ्यांनी दुग्धाभिषेकातून दिला.

    Maharashtra Timesतुकाराम मुंढेंच्या आधी धडक कारवाया, मग मकोकाचा इशारा; आता मंत्री भुजबळांची एंट्री, चर्चेला उधाण

    मकोका लागणार, जीआर निघाला

    दरम्यान, काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतून मुंढे यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारवाया आणि अटक आणि एफआयाआर यांचा आकडाही जाहीर केला होता. त्याशिवाय त्यांनी राज्यात प्रतिबंधित असलेले गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांची अवैधस्वरुपाची विक्री खपवून घेतली जाणार नाही, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करुन त्यांच्यावर मकोका अंतर्गत कठाेर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी यासंदर्भातला शासन निर्णयदेखील जारी केला आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही, असा प्रकारचा सज्जड दम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा