Chhagan Bhujbal On Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज सातत्यपूर्ण कारवाईवर आता मंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अन्न पदार्थांमध्ये सर्रासपणे भेसळ होते आणि हे गंभीर आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : सध्या राज्यभर तुकाराम मुंढे नावाचं वादळ घोंघावत आहे. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हातात घेतल्यापासून सर्वांचे लक्ष वेधले आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी यापूर्वीही जिथे काम केलं तिथं त्यांनी त्यांच्या कामाचा धडाका दाखवून दिला आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद घेत गेल्य काही दिवसांत झालेल्या कारवायांचा लेखाजोखा पत्रकारांच्या माध्यामातून सर्व जनतेसमोर मांडला. त्याचवेळी यापुढे गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांच्या संदर्भात कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं, विक्रेते, पुरवठादार व संचय करणाऱ्यांसह ग्राहकांवरही मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल अशा स्वरुपाचा मोठा निर्णय काल जाहीर केला. तसा आदेशच त्यांनी काढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जनतेच्या आरोग्याशी घातक असे कोणतेही काळे धंदे करणारे लोक आता कायद्याच्या कचाट्यात सापडले की गय केली जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मुंढेंच्या धडक कारवायांवर भाष्य केलं आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलं की, तुकाराम मुंढे धडक कारवाई करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. अन्न आहे, दूध, खायचे पदार्थ या सगळ्यात सर्रासपणे भेसळ केली जाते, हे सर्वांना माहिती आहे. मी स्वतः त्यांना फोन करुन सांगितलं की, दुधामध्ये भेसळ होते आहे. कोणतेही केमिकल त्यात टाकले जातात. त्यामुळे किडन्यांचे रोग वाढतात, परिणामी लोकांचे भविष्यंच उद्ध्वस्त होतं. तुम्हाला यावर जास्त जोर द्यावा लागेल, जेवढी कडक कारवाई करणं शक्य असेल तेवढी करा, असं भुजबळांनी सांगितंल.
‘जीव घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’
अन्न धान्य, औषधं यामध्ये काळबेरं करणाऱ्यांवर मकोका लावायचा असेत तर लावावा, कारण तुम्हाला माहिती असताना तुम्ही खोट्या औषधांमधून लोकांचे जीव घेत आहात, म्हणून कारवाई करा, असे मुंढेंना सांगितले असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा