Maharashtra Weather Updates : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. नांदेडमध्ये गारांचा पाऊस झाला असून आंबा, ज्वारी, फळबाग आणि हळदीचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये आज सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
नांदेडमध्ये गाऱ्यांचा पाऊस
नांदेड जिल्ह्यात आता अवकाळी पावसाने शेतीची चांगलीच नासधूस केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे यावेळी वादळी वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस पडला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये चाळीशी पार तापमान
एकीकडे काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असला तरी राज्यातील काही भागांमध्ये सूर्य अक्षरश: आग ओकताना दिसतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशाचा पार गेला आहे. नंदुरबारमध्ये आज सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. नंदुरबारमध्ये तब्बल 43.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ जळगावात 42.5 अंश तापमानाची नोंद झालीय. तर परभणीत 42.1 अंश तापमानाची नोंद झालीय.
हवमान विभागाने सांगितलेल्या आकडेवारीनुसार, दिवसभरात आज उदगिरला 40.2 अंश, साताऱ्याला 39.7 अंश, कोल्हापुरात 38.7 अंश, छत्रपती संभाजीनगरमध्ये 41 अंश, सोलापुरात 42, नाशिकमध्ये 40.3, नगरमध्ये 40.1, बारामतीत 39.6, जेऊरमध्ये 41, बीडमध्ये 41.9, पुणे 40.2, मालेगावात 41.6, धाराशिवमध्ये 39 अंश तापमानाची नोंद झाली आहे. आगामी काळात तापमानात आणखी वाझ होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

