Nanded Mother Killed Son: नांदेडमध्ये एका आईनेच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून या आईने मुलाची हत्या केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी आई नागाबाई राऊत (वय ६०) या नांदेडच्या धावरी बुद्रुक गावातील रहिवासी आहेत. त्यांना बालाजी आणि नागय्या अशी दोन मुलं आहेत. ३५ वर्षीय बालाजी याला दारूचं व्यसन होतं, तो नेहमी दारू पिऊन आपल्या आई सोबत वाद घालायचा. याशिवाय, तो आईला सतत मारहाण देखील करायचा, अशी माहिती आहे. त्याच्या याच त्रासाला कंटाळून त्याची पत्नी देखील आपल्या मुलासह माहेरी निघून गेली होती. शनिवारी रात्री नागाबाई या शेताच्या आखाड्यावर होत्या. यावेळी त्यांचा मुलगा बालाजी हा मद्यप्राशन करून तिथे आला. नेहमी प्रमाणे तो आपल्या आईशी वाद घालू लागला होता. वाद घालत असताना आईला मारहाणही करत होता.
बालाजी मारहाण करत असताना आता मात्र आईचा संयम सुटला आणि तिने तीक्ष्ण शस्त्राने त्याच्या डोक्यात आणि कानावर वार केले. रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, भाऊ नागप्पा नागा राऊत याच्या फिर्यादीवरून भोकर पोलिसांनी नागाबाई विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मद्यप्राशन करून नेहमी मारहाण करत असल्याच्या कारणावरून मुलाचा खून केल्याची कबुली महिलेने दिली आहे. दरम्यान जन्मदात्या मातेने पोटच्या लेकराची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड या करीत आहे.