भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्ताने चंद्रपूरमध्ये दोन गटांत भांडणं उफाळून आली. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केल्याने ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप काँग्रेससारखा होऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. गटबाजीमुळे भाजपची प्रतिमा खराब होण्याची चिंता होती.
मुनगंटीवार यांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी भाजपच्या याच स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने मुनगंटीवार हे जोरगेवार, अहिर आणि शोभाताई यांच्यावर संतापून आहेत. त्यांच्या कार्यक्रमात मुनगंटीवार जाणे अशक्यच होते. त्यामुळे त्यांनी आपला स्वतंत्र कार्यक्रम घेतला. तर दुसरीकडे शोभाताई यांनी मुनगंटीवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी या कार्यक्रमात यायला हवे होते, असे म्हणतानाच आपल्या पक्षाला काँग्रेस करू नका, असा टोला त्यांनी लगावला. यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे दिसून आले.
आपल्य पक्षाचे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. तेव्हा या जिल्ह्यातील पार्टीमध्ये का भांडणे व्हावीत. आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे का मोठ्या मनाने समोर येत नाही. दुसरा मेळावा कशासाठी घेता? यामुळे लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं. जोरगेवार यांचा हा जिल्हा असून चंद्रपूरचा आमदार आहे. कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे. सगळ्यांनी मोठेपणाने कार्यक्रमाला हजर गरजेचं होतं हे ओपनली सांगते. लोक आपल्या पक्षात यायला तयार आहे, लोकांची पक्षात येण्यासाठी झुंबड वाढलीये. पण इथे जर आपली भांडणे झालीत तर काँग्रेस झाली असं म्हणणार नाही? आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही. आपल्याला भाजप पक्ष टिकवायचा असल्याचं शोभाताई फडणवीस म्हणाल्या.